चालक-वाहकांची रात्र डासांसोबत एसटीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:38+5:302021-03-13T04:13:38+5:30
नागपूर : एसटीच्या चालक-वाहकांना बाहेरगावी मुक्कामी जावे लागते. परंतु, मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. त्यांना डासांसोबत एसटी ...

चालक-वाहकांची रात्र डासांसोबत एसटीतच
नागपूर : एसटीच्या चालक-वाहकांना बाहेरगावी मुक्कामी जावे लागते. परंतु, मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. त्यांना डासांसोबत एसटी बसमध्येच रात्र काढावी लागते. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एसटी प्रशासनाने याबाबत व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
रात्री मुक्कामी जाणाऱ्या बस १०७
मुक्कामी थांबणारे चालक १०७
वाहक १०७
सार्वजनिक शौचालयाचा अभाव
एसटी बस रात्री मुक्कामाला जातात. शहराच्या ठिकाणी एसटी महामंडळाचे विश्रामगृह असते. तेथे शौचालयाची व्यवस्था आहे. परंतु, स्वच्छता राहत नाही. ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालयाची वानवा असल्यामुळे चालक-वाहकांची गैरसोय होते. त्यांना उघड्यावर शौचासाठी जावे लागते. नागपूर विभागातील १०७ बस रात्री मुक्कामाला बाहेरगावी जातात. यापैकी जवळपास ४० ठिकाणी सार्वजनिक शौचालये नसल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे चालक-वाहकांची गैरसोय होत असून, एसटी प्रशासनाने चालक-वाहकांची योग्य व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
कोरोनामुळे मिळत नाही मदत
कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत बाहेरगावी मुक्कामी जाणाऱ्या चालक-वाहकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे सहसा त्यांना मदत येत नाही. ग्रामीण भागात शहरातून येणाऱ्या चालक-वाहकांना कोरोना तर नाही ना, या भीतीने नागरिक त्यांना मदत करीत नाहीत. त्यामुळे चालक-वाहकांचा नाईलाज होतो. कोरोनापूर्वी नागरिक चालक-वाहकांना मदत करीत होते. परंतु, कोरोनामुळे नागरिक मदत करण्यास धजावत नसल्याची माहिती चालक-वाहकांनी दिली.
ग्रामीण भागात व्यवस्थेबाबत पाठपुरावा करू
ग्रामीण भागात आणि अतिदुर्गम भागात काही प्रमाणात चालक-वाहकांची गैरसोय होते. अशा ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतींशी बोलून चालक-वाहकांची होत असलेली गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करू.
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक
प्रशासनाने योग्य व्यवस्था करावी
चालक-वाहकांच्या अव्यवस्थेमुळे कोरोनापासून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाहेरगावी जाणाऱ्या चालक-वाहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने बाहेरगावी जाणाऱ्या चालक-वाहकांची योग्य व्यवस्था करण्याची गरज आहे.
-अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
मुक्कामाची व्यवस्था हवी
ग्रामीण भागात बस घेऊन गेल्यानंतर तेथे मुक्कामाची व्यवस्था राहत नाही. सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे गैरसोय होते. त्यामुळे ग्रामीण भागात चालक-वाहकांना सुविधा मिळण्याची गरज आहे.
-विनोद काळे, चालक
विश्राम कक्षात स्वच्छता हवी
चालक-वाहक नेहमीच बाहेरगावी जातात. शहरात चालक-वाहकांसाठी विश्राम कक्ष असतो. परंतु, तेथे स्वच्छता राहत नाही. शौचालयात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे विश्राम कक्षात स्वच्छतेवर भर देण्याची गरज आहे तसेच पिण्याच्या पाण्याची टाकी नियमित स्वच्छ करण्याची मागणी आहे.
- गणेश बागडे
..............