वऱ्हाडाच्या बसला ट्रकची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 03:05 IST2016-04-29T03:05:38+5:302016-04-29T03:05:38+5:30
लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या खासगी बसला ट्रकचालकाने धडक मारल्यामुळे १० वऱ्हाडी जबर जखमी झाले.

वऱ्हाडाच्या बसला ट्रकची धडक
२२ वऱ्हाडी जखमी : १० जणांना जबर दुखापत, आरोपी ट्रकचालक गजाआड
नागपूर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या खासगी बसला ट्रकचालकाने धडक मारल्यामुळे १० वऱ्हाडी जबर जखमी झाले. गुरुवारी सकाळी ६.३० ला इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील अशोक चौकाजवळ हा भीषण अपघात झाला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
गारला (कामठी) येथील यादव मोळकूजी चिंचुलकर (वय ६५) यांचा भाचा किशोर भोयर याचे आज गिरड (जि. वर्धा) येथे लग्न होते. त्यामुळे लग्नासाठी खापरखेडा येथून दोन खासगी बसमध्ये बसून वऱ्हाडी गिरड जि. वर्धा येथे निघाले. एक बस पुढे निघून गेली तर, दुसरी ३० ते ३५ वऱ्हाडी बसलेली बस (एमएच ३१/ एमपी ७६११) अशोक चौकाजवळ आली. तेवढ्यात भरधाव वेगात असलेल्या ट्रकने (सीजी ०४/ ई ८२६५) बसला जोरदार धडक मारली. त्यामुळे बसमधील २० ते २२ वऱ्हाडी जखमी झाले. त्यातील चिंतामणी अंतुजी वाणी, स्वप्नील वाणी, विकास दशरथ गिरी, राजू गायधने, लीलाबाई सरडे, कमलाबाई बोरकर, आसाराम मंडपे, ललिता उपारे, ज्योती महाजन आणि भावेश गिरे यांना जबर जखमा झाल्या. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकावर धाव घेतली. मात्र, आरोपी चालकाने स्वत:ला ट्रकच्या कॅबिनमध्ये बंद करून घेतले. वेळीच पोलीस पोहोचल्याने संभाव्य अनर्थ टळला.
इमामवाडा पोलिसांनी आरोपी ट्रकचालक रिजवान हसन कयामुल हसन (वय २५, रा. फतेहपूर जि. उत्तर प्रदेश) याला अटक केली.
नवरदेवाची धावपळ
ट्रकने धडक दिल्यामुळे जोरदार आवाज झाला अन् बसमधील प्रवासी एकमेकांवर पडले. कुणाला सीटच्या तर कुणाला खिडकीच्या बाजूला असलेल्या लोखंडी पट्ट्या लागल्या. त्यामुळे महिला-मुलांच्या किंकाळ्या सुरु झाल्या. दरम्यान, समोरच्या बसमध्ये असलेल्या नवरदेवाला एका नातेवाईकाने फोन करून ही माहिती दिली. त्याने लगेच बस माघारी फिरवली. अपघातात जखमी झालेल्या नातेवाईक, वऱ्हाड्यांना मेडिकलमध्ये नेले. तेथे उपचार करून घेतल्यानंतर पुन्हा वऱ्हाडाची बस गिरडकडे निघाली.