भरधाव कारचालकाने युवकाला मारली धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST2021-04-04T04:09:14+5:302021-04-04T04:09:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मित्रांसोबत रस्त्याच्या बाजूला गप्पा करीत असलेल्या एका तरुणाला भरधाव कारचालकाने जोरदार धडक मारली. तो ...

भरधाव कारचालकाने युवकाला मारली धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्रांसोबत रस्त्याच्या बाजूला गप्पा करीत असलेल्या एका तरुणाला भरधाव कारचालकाने जोरदार धडक मारली. तो तरुण रस्त्यावर जखमी होऊन पडला असताना आरोपी कारचालक मात्र त्याला मदत करण्याऐवजी पळून गेला. संकेत नंदलाल यादव (वय ३०) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
काछीपुऱ्यात राहणारा संकेत २९ मार्चच्या रात्री १०.३० च्या सुमारास आशिष आणि हर्ष वर्मा या मित्रांसह रस्त्याच्या बाजूला गप्पा करीत होता. अचानक भरधाव वेगात आलेल्या एका कारचालकाने संकेतला जोरदार धडक मारली. तो गंभीर जखमी होऊन पडला असताना आरोपी कारचालक तेवढ्याच वेगाने निघून गेला. संकेत गंभीर जखमी झाला. त्याला त्याच्या मित्रांनी धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. संकेतचे वडील फुटपाथवर रुमाल, कॅप विकून कुटुंबाचा गाडा चालवितात. त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. दरम्यान, मित्राच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी अपघाताची नोंद केली. मात्र, अद्याप आरोपीचा छडा लागला नाही. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
---