विसर्जनासाठी पिण्याचे पाणी

By Admin | Updated: September 21, 2015 02:47 IST2015-09-21T02:47:38+5:302015-09-21T02:47:38+5:30

वेगवेगळे उपक्रम राबवून महापालिकेची आर्थिक बचत केल्याचा दावा करणारी महापालिका दुसरीकडे मात्र पैशाची उधळपट्टी करीत असल्याचे समोर आले आहे

Drinking Water for Immersion | विसर्जनासाठी पिण्याचे पाणी

विसर्जनासाठी पिण्याचे पाणी

लोकमत विशेष
नागपूर : वेगवेगळे उपक्रम राबवून महापालिकेची आर्थिक बचत केल्याचा दावा करणारी महापालिका दुसरीकडे मात्र पैशाची उधळपट्टी करीत असल्याचे समोर आले आहे. राज्याच्या एका भागात दुष्काळ पडला असताना नागपुरात मात्र गणेश विसर्जनासाठी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्ये चक्क पिण्याचे पाणी टँकरने आणून टाकले जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. तलावात पाणी असताना ते पाणी कृत्रिम टँकमध्ये का वापरले जात नाही, याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. विशेष म्हणजे टँकरने होणाऱ्या या पाणीपुरवठ्याचे बिल ओसीडब्ल्यू या पाणीपुरवठा कंपनीला मिळणार आहे. त्यामुळे विसर्जनातही ओसीडब्ल्यू ‘मोदक’ कमवित आहे. महापालिकेचे हे कसले ‘स्मार्ट’नियोजन असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
शहरातीला तलावांचे संवर्धन करण्यासाठी, जलप्रदूषण रोखण्यासाठी गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन तलावात न करता कृत्रिम तलाव तयार करून त्यात करावे, असा विचार अनिल सोले यांनी महापौर असताना मांडला होता. गणपती म्हणजे धार्मिक श्रद्धास्थान. असे असतानाही नागपूरकरांनी सोले यांच्या या संकल्पेनेचे स्वागत केले. शेकडो गणपतींचे विसर्जन महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्ये केले जाऊ लागले. दरवर्षी या मोहिमेला प्रतिसाद वाढत गेला. त्यामुळे महापालिकेने शहराच्या सर्वच भागात मोठमोठे कृत्रिम टँक उभारण्यास सुरुवात केली. महापौर प्रवीण दटके यांनीही या मोहिमेला बळ दिले. सोले व दटके यांनी दोन्ही नेत्यांचा उद्देश चांगला असला तरी महापालिकेची यंत्रणा त्यांच्या डोळ्यात धूळ झोकण्याचे काम करीत आहे.
एक दिवसाचा गणपती, दीड दिवसाचा गणपती, तीन दिवसाच्या गणपतीचे विसर्जनही सुरू झाले आहे. शहराच्या विविध भागात महापालिकेतर्फे विसर्जनासाठी कृत्रिम टँक उभारण्यात आले आहे. सक्करदरा तलाव, फुटाळा तलाव, गांधीसागर, सोनेगाव तलाव आदी भागात असे कृत्रिम टँक उभारले आहेत. मात्र, या टँकमध्ये महापालिकेच्या सेमिनरी हिल्स, लक्ष्मीनगर, सक्करदरा, वंजारीनगर या जलकुंभांवरून पिण्याचे पाणी टाकले जात आहे. दररोज सुमारे ४० ते ५० टँकर पाणी या कृत्रिम टँकमध्ये रिचविले जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. रविवारी दुपारी ४ च्या सुमाास फुटाळा तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्ये टँकरने आणलेले पिण्याचे पाणी ओतणे सुरू होते. लोकमत प्रतिनिधीने याबाबत विचारणा केली असता टँकर चालकाने अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेचे आपण पालन करीत असल्याचे सांगितले. सक्कारदरा परिसरातही असाच प्रकार आढळून आला. सक्करदरा व फुटाळा तलावात मुबलक जलसाठा आहे. शहरातील इतर तलावांमध्येही भरपूर पाणी आहे. तलावांच्या परिसरात विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम टँकरमध्ये पिण्याचे पाणी रिचविण्याऐवजी मोटरपंपाद्वारे तलावातील पाणी घेतले तर लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची बचत होऊ शकते. शहराच्या काही भागात नागरिकांना अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागते. टँकर मिळविण्यासाठी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागते. दुसरीकडे विसर्जनासाठी तलावातील पाणी वापरण्याऐवजी पिण्याच्या पाण्याचे टँकर रिकामे केले जात आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी गाजावाजा करून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचे हे एक दुसरे वास्तव आहे.

कसे होणार निर्विघ्न विसर्जन ?
विसर्जन स्थळी खड्डे : सक्करदरा तलावातही निर्माल्य
नागपूर : शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे. घरोघरी गणपती असल्याने आनंदाचे वातावरण आहे. मनपा प्रशासनानेही विसर्जनाची तयारी सुरू केली आहे. तलावाचे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलाव व खड्डे निर्माण करून विसर्जनाची व्यवस्था केली जात आहे. परंतु विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे असल्याने गणेश भक्तांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जन निर्विघ्न कसे होणार, असा प्रश्न भाविकांना पडला आहे.
शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्यातच विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या मार्गांची दुरुस्ती सुरू नाही. काही रस्त्यावरील डांबर आणि गिट्टी बाहेर पडली आहे. शहरातील सर्वच भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे.
फुटाळा तलाव परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. गांधीसागरच्या आजूबाजूच्या रस्त्यावरील गिट्टी बाहेर आली आहे. सक्करदरा तलाव भागातील रस्त्यावरही खड्डे आहे. तसेच या तलावात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. तलावाची स्वच्छता होत नसल्याने पाणी दूषित झाले आहे.
सोनेगाव तलाव व अंबाझरी ओव्हर फ्लो च्या बाजूच्या रस्त्यावर खड्डे आहेत. गोरेवाडा, संजय नगर खाण, नाईक तलाव परिसरातील रस्त्यांचीही अशीच अवस्था आहे.
तलावातील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागातर्फे कृ त्रिम तलाव व तळे निर्माण केले जात आहे. निर्माल्य संकलनासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे.
परंतु मनपाच्या हॉटमिक्स विभागाकडून रस्ते दुरुस्त होत नसल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)

कार्यकारी अभियंत्याचा ‘नो रिस्पॉन्स’
पिण्याचे पाणी टँकरद्वारे विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्ये टाकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्यावर लोकमत प्रतिनिधीने जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. गायकवाड यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण अखेरपर्यंत त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळाला नाही.

Web Title: Drinking Water for Immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.