दारुड्या ट्रेलरचालकाचा थरार

By Admin | Updated: March 29, 2015 02:26 IST2015-03-29T02:26:27+5:302015-03-29T02:26:27+5:30

दारुड्या ट्रेलरचालकाने, पोलिसांपासून वाचण्यासाठी सीए रोडवर चांगलाच थरार घडविला.

The drill of a drunken trailer | दारुड्या ट्रेलरचालकाचा थरार

दारुड्या ट्रेलरचालकाचा थरार

नागपूर : दारुड्या ट्रेलरचालकाने, पोलिसांपासून वाचण्यासाठी सीए रोडवर चांगलाच थरार घडविला. अनियंत्रित ट्रेलर डिप्टी सिग्नलजवळील एका गॅरेजमध्ये घुसल्याने चार वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र अनियंत्रित ट्रेलरचालकाच्या कृत्यामुळे परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती.
शुक्रवारी मध्यरात्री हिंगणा येथून एचआर-३८-७८७४ या क्रमांकाचा ट्रेलर लोखंड घेऊन उमरेडच्या दिशेने चालला होता. ट्रेलरचा चालक हिरालाल परते (२८) याने दारू ढोसल्याने, त्याचे ट्रकवरून नियंत्रण सुटले होते. ट्रेलर सीए रोडवरून जात असताना, पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाच्या हे लक्षात आले. त्यांनी ट्रेलरचा पाठलाग सुरू केला. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहनाचा वेग वाढविला. मिळेल त्या दिशेने तो सुसाट पळत होता. पेट्रोलिंग पथकाने कंट्रोलला सूचना दिल्याने, गणेशपेठ, लकडगंज ठाण्याचे पोलीस कामाला लागले होते. ट्रेलरचालक मिनीमातानगरच्या दिशेने निघाला.
डिप्टीसिग्नल रेल्वे क्रॉसिंगजवळ त्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या पोलिसांची गाडी नजरेस पडली. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या खाली वाहन उतरविले. त्यामुळे दोन विजेच्या खांबाला धडक बसल्याने खांब कोसळून पडले, विजेच्या ताराही तुटल्या. येथे अमन आॅटोडिल व वर्कशॉप आणि रवी डिझेल नावाचे गॅरेज आहे. ट्रेलर थेट गॅरेजमध्येच शिरला. येथे उभ्या असलेल्या चार वाहनांचे चांगलेच नुकसान झाले. ट्रेलरचालक गाडी टाकून फरार झाला.
पोलिसांनी त्याला मिनीमातानगरातून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध लकडगंज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे कुठलीही गंभीर घटना घडली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The drill of a drunken trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.