गुणवंत साक्षीच्या मुठीत येणार स्वप्नांचे आभाळ!
By Admin | Updated: June 11, 2015 03:07 IST2015-06-11T03:07:35+5:302015-06-11T03:07:35+5:30
स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असली तर प्रतिकूलतेतून त्याचे मार्गही सापडतात.

गुणवंत साक्षीच्या मुठीत येणार स्वप्नांचे आभाळ!
नागपूर : स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असली तर प्रतिकूलतेतून त्याचे मार्गही सापडतात. परिस्थितीपुढे शरण होणे सोपे असते, पण परिस्थितीशी संघर्ष करताना काट्यांची पर्वा न करता रक्ताळलेल्या पायांनी स्वप्नांच्या मागे धावण्याचे ध्येयवेड असले तर परिस्थितीलाही शरण आणता येते. याचेच एक उदाहरण म्हणजे साक्षी भरणे.
साक्षी एका आॅटोचालकाची मुलगी. घरची परिस्थिती तशी बेताचीच. परंतु परिस्थितीचे रडगाणे न गाता शिक्षणाद्वारेच आपली परिस्थिती पालटू शकते. या विश्वासाने अभ्यासावरच तिने लक्ष केंद्रित केले आहे. तिचे ‘अॅरोस्पेस इंजिनीअर’ होण्याचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने तिने जिद्दीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण घेऊन आपण त्यादिशेने प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे दाखवून दिले. परंतु पुढची शैक्षणिक वाटचाल आर्थिकदृष्ट्या तिच्या आई-वडिलांसाठी असाध्य अशीच होती. लोकमतने पुढाकार घेतला आणि तिच्या शैक्षणिक मदतीसाठी कुणीतरी पुढे यावे, असे आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयआयटी पिनॅकल व अग्रवाल कोचिंग क्लासेसचे प्रमुख जगदीश अग्रवाल धावून आले आणि त्यांनी लोकमतच्या कार्यालयात गुणवंत साक्षीच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. इतकेच नव्हे तर तिला नोकरी लागेपर्यंत तिच्या पुस्तकांपासून तर ट्युशन क्लासेसपर्यंत शिक्षणावर येणारा सर्व खर्च करण्याचेही आश्वासन दिले.
साक्षी धनंजय भरणे असे या गुणवंत विद्यार्थिनीचे नाव. वडील आॅटोने शाळेच्या विद्यार्थ्यांना ने-आण करतात. त्यावरच त्यांंचे घर चालते. वडील मूळचे मनसर कांद्रीचे रहिवासी असून सध्या भरतनगर अमरावती रोड येथे एका भाड्याच्या घरात ते सहकुटुंब राहतात. आई नीतू ही गृहिणी तर बहीण पाचव्या वर्गात शिकते. तिचा अभ्यास स्वत: साक्षीच घेते. सरस्वती शाळेची विद्यार्थिनी असलेली साक्षी अभ्यासात हुशार आहे. वडिलांसोबतच तिला अभ्यासात वर्गशिक्षक तुलनकर आणि आशिष हरदास व ललित देवालकर यांचेही मोठे योगदान लाभले आहे.
दहावीच्या परीक्षेत तिने ९५ टक्के गुण घेऊन आईवडिलांच्या मेहनतीचे चीज करून दाखविले.