अपेक्षाच्या स्वप्नांना लाभले पंख
By Admin | Updated: June 24, 2017 02:26 IST2017-06-24T02:26:36+5:302017-06-24T02:26:36+5:30
अपेक्षा कोटूरवार. मोठे स्वप्न पाहणारी एक धडपडी मुलगी. घरच्या अठराविश्व दारिद्र्याशी दोन हात करीत कशीतरी

अपेक्षाच्या स्वप्नांना लाभले पंख
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपेक्षा कोटूरवार. मोठे स्वप्न पाहणारी एक धडपडी मुलगी. घरच्या अठराविश्व दारिद्र्याशी दोन हात करीत कशीतरी पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षापर्यंत पोहोचली. परंतु पुढच्या शिक्षणासाठी पैसेच नव्हते. एके दिवशी ती लोकमत भवनात आली. आपली कैफियत मांडली. लोकमतनेही आपली सामाजिक बांधिलकी जपत तिच्या शिक्षणासाठी मदतीच्या आवाहनाचे वृत्त प्रकाशित केले. अपेक्षाला मदत मिळाली. तिनेही या मदतीचे सोने करीत बी. ई. सिव्हीलच्या अंतिम वर्षापर्यंतचा प्रवास अगदी प्रथम श्रेणीत पूर्ण केला आहे. शुक्रवारी ती आपल्या आईसोबत अनपेक्षितपणे लोकमत कार्यालयात आली अन् तिच्या स्वप्नांना पंख दिल्याबद्दल तिने लोकमतबाबत कृतज्ञता व्यक्त केली. अपेक्षा प्रतापनगरात राहते. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. तिची आई जया कोटूरवार इतरांकडे स्वंयपाक करून कसेतरी घर चालवते. २०१५ साली पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाला असताना ती लांडेसर यांच्या मार्गदर्शनानुसार लोकमत कार्यालयात आली. तिची कैफियत ऐकल्यानंतर लोकमतने अपेक्षाच्या मदतीसाठी वृत्त प्रकाशित केले. ते वाचून बेरार फायनान्सचे संचालक संजय जवंजाळ पुढे आले. त्यांनी शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याची हमी दिली व ती पूर्णही केली. अपेक्षाने हिंगण्यातील रायसोनी अकॅडमी येथून शिक्षण सुरू केले. संदीप चौधरी, भोतकर सर यांनी अपेक्षाच्या शिकवणी वर्गासाठी आर्थिक मदत केली. या सर्व सहृदयी माणसांच्या बळावर अपेक्षाने बी. ई. सिव्हिलच्या अंतिम वर्षापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. शुक्रवारी लोकमत कार्यालयात आल्यावर तिने संपादकीय मंडळींशी आपल्या यशाचा प्रवास ‘शेअर’ केला आणि हे केवळ लोकमतमुळे घडल्याचे सांगत कृतज्ञताही व्यक्त केली.
आता एम. टेक.चे आव्हान
अंतिम वर्षाच्या शिक्षणाची जबाबदारी संजय जवंजाळ यांनी स्वीकारली आहे. पण, अपेक्षाला खूप शिकून, नोकरी मिळवून आपल्या आईला आधार द्यायचा आहे. शिक्षणासाठी कितीही कठोर परिश्रम घ्यायला ती तयार आहे. पुढे एम. टेक. करायचे आहे. परंतु पुन्हा गरिबी तिच्या यशाच्या मार्गाआड आव्हानाच्या रूपात उभी झाली आहे. एम. टेक.च्या शिक्षणासाठी पैसेच नसल्याने आपले स्वप्न अर्ध्यावर मोडते की काय अशी भीती तिला सतावत आहे. तिची ही भीती दूर करून तिच्या पुढच्या शिक्षणासाठी समाजातील सहृदयी माणसांचे मदतीचे हात यावेळीही पुढे येतील अशी अपेक्षा आहे.