अंधारलेल्या डोळयांनी पाहिले प्रकाशाचे स्वप्न

By Admin | Updated: June 18, 2014 01:30 IST2014-06-18T01:30:49+5:302014-06-18T01:30:49+5:30

वय वर्षे पाच. फुलपाखरासारखे बेधुंद बागडण्याचे हे दिवस़ नकळता देवी नावाचा आजार झाला. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही या आजाराने अनिकेतचे डोळे हिरावून गेलेच. या घटनेने आई खचली, मात्र तिने धीर सोडला नाही.

The dream of light seen by the dark eyes | अंधारलेल्या डोळयांनी पाहिले प्रकाशाचे स्वप्न

अंधारलेल्या डोळयांनी पाहिले प्रकाशाचे स्वप्न

अपंगांमध्ये अनिकेत विदर्भातून पहिला
मंगेश व्यवहारे - नागपूर
वय वर्षे पाच. फुलपाखरासारखे बेधुंद बागडण्याचे हे दिवस़ नकळता देवी नावाचा आजार झाला. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही या आजाराने अनिकेतचे डोळे हिरावून गेलेच. या घटनेने आई खचली, मात्र तिने धीर सोडला नाही. नियतीला हेच मान्य असेल, या भावनेतून ती हिंमतीने उठली, मुलाच्या पंखाला बळ देण्यासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. डोळयात अंधार असतानाही अनिकेतने प्रकाशाचे स्वप्न पाहिले आणि जिद्दीने, मेहनतीने ते वास्तवातही उतरविले़ आज अनिकेत दहावीच्या परीक्षेत ८९.२० टक्के गुण घेत, अपंगामध्ये विदर्भातून पहिला आला आहे़
जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर अनिकेत दिनकर बेंडे या विद्यार्थ्याने हे घवघवीत यश मिळवून दृष्टिहीनापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. अनिकेतने कधीही पहिला नंबर सोडला नाही. त्याने १ ते ७ पर्यंत त्याचे शिक्षण अंध शाळेत झाले. आणि आठव्या वर्गानंतर त्याने साधारण विद्यार्थ्यांच्या वर्गात शिक्षण घेतले. डोळसांबरोबर शिकत असला तरी, डोळसांच्या तुलनेत त्याची गुणवत्ता कुठेच कमी नव्हती़ निव्वळ अभ्यासातच नाही, तर संगीतातही त्याची गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे. तो उत्कृष्ट सिंथेसायझर वाजवितो. गायनाच्या तर त्याने पाच परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या आहे. त्याचे गायनाचे बरेच स्टेज प्रोग्राम झाले आहे. क्रिकेटचा अत्यंत चाहता असणाऱ्या अनिकेतने परीक्षेच्या काळातही आयपीएल वर्ल्डकपच्या मॅचेसचा आनंद घेतला. अनिकेतचा नम्र स्वभाव, अभ्यासू वृत्ती, जिद्द त्याच्यातील या गुणांमुळे तो सर्वांचा आवडता आहे. अनिकेतला आईबरोबरच त्याच्या शाळेतील शिक्षिकेचे विशेष सहकार्य लाभले. त्याची आई डोळस पुस्तकातून वाचायची. ते अनिकेत ब्रेलमध्ये लिहून घ्यायचा. दिवसभर तो शाळा, गायन, संगीत यात रमायचा. आणि रात्री ११.३० ते ३.५० दरम्यान अभ्यास करायचा. अभ्यासात कधीच खंड पाडला नाही. शाळेत अंध विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विद्या बचाले या विशेष शिक्षिकेने अनिकेतला विशेष सहकार्य केले. त्याला आलेल्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याची लेखनिक असलेली उन्नती मामुलकर हिचाही अनिकेतच्या यशात मोलाचा वाटा आहे.

Web Title: The dream of light seen by the dark eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.