संत साहित्याच्या अभ्यासिका डॉ. जुल्फी शेख यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:45+5:302021-01-13T04:21:45+5:30
नागपूर : संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. जुल्फी शेख (६६, रा. जाफरनगर) यांचे दीर्घ आजाराने निधन ...

संत साहित्याच्या अभ्यासिका डॉ. जुल्फी शेख यांचे निधन
नागपूर : संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. जुल्फी शेख (६६, रा. जाफरनगर) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर जरीपटका कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती प्रो. तालिब शेख व मुलगा आशू असा परिवार आहे.
डॉ. जुल्फी यांचा जन्म गोंदिया येथे झाला. त्यांनी भंडारा येथील रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मुस्लिम मराठी संतसाहित्यावरील त्यांच्या संशोधनासाठी त्यांना राष्ट्रसंत तुकडॊजी महाराज नागपूर विद्यापीठाची डी.लिट. प्राप्त झाली होती. त्यांचे ‘अक्षरवेध’ आणि ‘मी कोण’ हे काव्यसंग्रह, विविध समीक्षाग्रंथ, त्यांचप्रमाणे संतसाहित्यावर आधारित अनेकविध ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. गालिबच्या पत्रांचे मराठी भाषांतर करणाऱ्या डॉ. शेख यांनी तुकडोजी महाराज, बहादूरशाह जफर यांच्यावरही लेखन केले होते. त्यांची ‘मुस्लिम मराठी कविता’, ‘श्री ज्ञानेश्वरांचा वाङ्मयीन वारसा’, ‘नवे प्रवाह नवे स्वरूप’ इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या शिवाय, हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशालेचे मराठी रूपांतरही केले होते. त्या करिता त्यांना महाराष्ट्र शासनाचा वा. रा. कांत पुरस्कारदेखील प्राप्त झाला होता. याशिवाय, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, जनसारस्वत, साहित्य भूषण, कस्तुरबा गांधी, लोकमित्र असे विविध पुरस्कारदेखील प्राप्त झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची विद्वत परिषद आणि विधिसभेच्याही त्या माजी सदस्य होत्या.
अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैचारिक साहित्य संमेलन, अखिल भारतीय बहुभाषी साहित्य संमेलन यांचे त्यांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले होते. त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या एकोणविसाव्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
.......