डॉ. पालतेवार यांना अटकपूर्व जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 00:49 IST2021-07-31T00:48:24+5:302021-07-31T00:49:00+5:30
Dr Samir Paltewar, bail reject मेडिट्रिना रुग्णालयाचे संचालन करणाऱ्या व्हीआरजी हेल्थ केअर कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर नारायण पालतेवार (वरिष्ठ न्यूरोसर्जन) यांना आर्थिक हेराफेरी प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.

डॉ. पालतेवार यांना अटकपूर्व जामीन नाकारला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिट्रिना रुग्णालयाचे संचालन करणाऱ्या व्हीआरजी हेल्थ केअर कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर नारायण पालतेवार (वरिष्ठ न्यूरोसर्जन) यांना आर्थिक हेराफेरी प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.
न्यायमूर्ती विनय जोशी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. या निर्णयाविरुद्ध पालतेवार सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण मंजूर केले. याकरिता पालतेवार यांनी विनंती केली होती.
कंपनीचे भागधारक गणेश चक्करवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२१ रोजी डॉ. पालतेवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०९ ४०६, ४६५, ४६७, २६८, ४७१ व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पालतेवार यांनी संगणकीय यंत्रणेमध्ये मूळ बिलापेक्षा कमी रकमेची बिले दाखवून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा चक्करवार यांचा आरोप आहे. सत्र न्यायालयाने गेल्या १५ मार्च रोजी पालतेवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खारीज केला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालतेवार यांच्यातर्फे वरिष्ठ वकील ॲड. अविनाश गुप्ता व ॲड. आकाश गुप्ता तर, चक्करवार यांच्यातर्फे ॲड. श्याम देवानी यांनी कामकाज पाहिले.