डॉ. मित्रा यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST2021-02-05T04:45:30+5:302021-02-05T04:45:30+5:30
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अर्ज ...

डॉ. मित्रा यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अर्ज दिला आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला होता, त्यानंतर त्यांनी तो मागे घेतला. आता अवघ्या चार महिन्यातच वैयक्तिक व कौटुंबिक कारण देत पुन्हा सेवानिवृत्तीचा अर्ज दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जॉइंट रिप्लेसमेंट विशेषज्ज्ञ म्हणून विदर्भातच नव्हे, तर देशात डॉ. सजल मित्रा प्रसिद्ध आहेत. त्यांनी मेडिकलच्या अस्थिरोग विभागात १९९० पासून सांध्याचे प्रत्यारोपण (जॉइंट रिप्लेसमेंट) सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत हजारावर प्रत्यारोपण झाले. विशेष म्हणजे, सिकलसेल रुग्णांमध्ये सर्वाधिक ‘हिप जॉइंट’ शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी डॉ. मित्रा यांच्याकडे अधिष्ठातापदाचा कार्यभार आला. त्यानंतरही ते वेळ काढून शस्त्रक्रिया करीत होते. या दोन वर्षात त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावले. यात ट्रॉमा केअर सेंटरला अद्ययावत स्वरूप दिले. कोरोनाच्या काळात केवळ २० दिवसांत त्यांनी ट्रॉमा केअर सेंटरला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरित केले. अनेक अद्ययावत उपकरणे मेडिकलमध्ये आणण्यास त्यांनी पुढाकार घेतला. परंतु सप्टेंबर महिन्यात त्यांनी प्रकृतीचे कारण देत सेवानिवृत्तीचा अर्ज दिला. ऑक्टोबर महिन्यात तो मागेही घेतला. त्यानंतर त्यांनी मेडिकलमधील अनेक प्रलंबित प्रकल्पांसह नव्या प्रकल्पांना वेग दिला. यात हृदय व यकृताच्या प्रत्यारोपणासाठी ट्रान्सप्लांट युनिट, कॅन्सर हॉस्पिटल, स्पाईन-स्पोर्ट्स इन्जुरी सेंटर, स्कील लॅब, मानवी दुग्धपेढी, स्किन बँक आदी प्रकल्पांचा समावेश होता. परंतु ३० जानेवारी रोजी पुन्हा स्वेच्छानिविृत्तीचा अर्ज दिला आहे. मागील सात दिवसांपासून ते रेजेवरही आहेत. अचानक दिलेल्या अर्जामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.