डॉ. किशोर टावरी यांचे निधन
By Admin | Updated: September 1, 2016 02:59 IST2016-09-01T02:59:57+5:302016-09-01T02:59:57+5:30
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे (एमसीआय) सदस्य, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) अध्यक्ष व नागपूर

डॉ. किशोर टावरी यांचे निधन
वैद्यकीय क्षेत्रात शोककळा
नागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे (एमसीआय) सदस्य, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) अध्यक्ष व नागपूर मेडिकल कॉलेजच्या रेडिओलॉजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. किशोर बद्रिदास टावरी (५९) यांचे बुधवारी दुपारी २.३० वाजता दीर्घ आजाराने निवासस्थानी निधन झाले. डॉ. टावरी गेल्या डिसेंबरपासून मोटोन्युरॉन डिसीज या गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रस्त होते. उत्कृष्ट शिक्षक, चिकित्सक व ज्ञानाचा सागर असा त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
धामणगावच्या बाजूला असलेल्या घुईखेड येथे २७ सप्टेंबर १९५७ रोजी डॉ. टावरी यांचा जन्म झाला. मेडिकलच्या १९७४ च्या तुकडीचे ते विद्यार्थी होते. याच महाविद्यालयातून रेडिओलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक संस्थांचे पद भूषविले. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते.
२००५-०६ मध्ये नागपूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष होते. २०१० मध्ये इंडियन रेडिओलॉजिकल इमेजिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. याच वर्षी ते सार्क रेडिओलॉजिकल असोसिएशनचे अध्यक्ष राहिले. नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य होते. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपले अनेक शोधनिबंध सादर केले होते. ते उत्स्फूर्त वक्ते होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. नागपूर मेडिकल कॉलेजमधील रेडिओलॉजी विभागाच्या विकासासाठी त्यांचे प्रयत्न मोठे होते. त्यांच्या पुढाकारामुळेच १७ एप्रिल २०१६ रोजी नागपुरात ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’चा पहिला पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा डॉक्टरांना देण्यात आला. वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा दिली. इस्पितळांमधील आरोग्य सेवेचे दर सुनिश्चित करणाऱ्या ‘क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’मध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. ‘कट प्रॅक्टिस’च्या विरोधात डॉ. टावरी यांनी विशेष काम केले. ते नेहमी आपल्या भाषणातून डॉक्टरांना अनैतिक प्रकारापासून दूर राहण्याचे आवाहन करीत. मुंबई येथे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नवीन इमारत उभी करण्यास त्यांचा मोठा वाटा होता. उत्तम शिक्षक व अतिशय शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
त्यांच्या मागे पत्नी डॉ. भारती, मुले डॉ. अभिजित व इंजि. अभिषेक व मोठा आप्तपरिवार आहे. अंत्ययात्रा उद्या गुरुवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या रामदासपेठ येथील राहत्या निवासस्थानावरून मोक्षधाम घाटावर जाईल.
काय आहे मोटोन्युरॉन
नागपूर : डॉ. किशोर टावरी यांचे निधन मोटो न्युरॉन डिसीज (एमएनडी) या आजाराने झाले. हा आजार मांसपेशीतील हालचालींना नियंत्रित करणाऱ्या पेशींना नष्ट करतो. यामध्ये बोलणे, चालणे, श्वास घेणे व गिळण्याची प्रक्रिया अंतर्भूत आहे. साधारणत: या आजारात मेंदूतील मज्जापेशी ब्रेन स्टेम आणि स्पायनल कॉर्डपर्यंत जातात. त्यातून त्या मांसपेशीपर्यंत पोहोचतात. या प्रक्रियेत अडथळे आल्यानंतर मांसपेशी योग्यरीत्या कार्य करीत नाहीत. त्या हळूहळू कमजोर होतात. नंतर काही कालावधीनंतर त्यांची प्रक्रियाच बंद होते.