डाॅ. आंबेडकर भवन ताेडण्याची एसआयटीमार्फत चाैकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST2021-08-12T04:11:40+5:302021-08-12T04:11:40+5:30

नागपूर : अंबाझरी उद्यान परिसरात व्यावसायिक पर्यटन विकासाच्या नावाखाली उद्यानालगत असलेले ऐतिहासिक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त करण्यात ...

Dr. Check Ambedkar Bhavan through SIT | डाॅ. आंबेडकर भवन ताेडण्याची एसआयटीमार्फत चाैकशी करा

डाॅ. आंबेडकर भवन ताेडण्याची एसआयटीमार्फत चाैकशी करा

नागपूर : अंबाझरी उद्यान परिसरात व्यावसायिक पर्यटन विकासाच्या नावाखाली उद्यानालगत असलेले ऐतिहासिक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एसआयटीमार्फत चाैकशी करावी आणि पूर्ण साैंदर्यीकरणासह डाॅ. आंबेडकर भवनाची सुसज्ज पुनर्बांधणी करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जाेगेंद्र कवाडे यांनी केली.

डाॅ. बाबासाहेबांच्या स्मरणार्थ महापालिकेने हे भवन उभारले हाेते. असे असताना एमटीडीसीने महापालिकेची परवानगी न घेता ते उद्ध्वस्त करण्याचे पाप केल्याचा आराेप प्रा. कवाडे यांनी केला. मनपाने विशिष्ट अटींसह ही जमीन एमटीडीसीला हस्तांतरित केली हाेती, पण एमटीडीसीने अटी पायदळी तुडविल्या. मनपानेही याची दखल घेतली नाही. मनपा आणि एमटीडीसीच्या या कृत्यामुळे समाजात संतापाची लाट असून, त्याचा कधीही उद्रेक हाेऊ शकताे, असा इशारा त्यांनी दिला. कुणाच्या सांगण्यावरून सांस्कृतिक भवन पाडण्याची अक्षम्य कृती केली? भाजपचे आमदार डाॅ. परिणय फुके यांच्या सांगण्यावरूनच गरुडा कंपनीने डाॅ. आंबेडकर भवन उद्ध्व‌स्त करण्यात आल्याचा थेट आराेप प्रा. कवाडे यांनी केला. त्यामुळे समाजामध्ये तीव्र असंताेष पसरल्याचे सांगत, फुके यांनी समाजाची सशर्त माफी मागावी, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चाैकशी करावी आणि दाेषींवर कठाेर कारवाई करावी. याशिवाय पूर्वीच्याच ठिकाणी साैंदर्यीकरणासह सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. भवन पाडण्याचा निषेध म्हणून येत्या ३० ऑगस्ट राेजी महापालिका तसेच एमटीडीसीच्या कार्यालयावर निषेध माेर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार परिणय फुके यांच्या घरावरही माेर्चा काढण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. पत्रपरिषदेला पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, शहर अध्यक्ष अरुण गजभिये, भगवान भाेजवानी, अजय चव्हाण, बाळू घरडे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Dr. Check Ambedkar Bhavan through SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.