आंबेडकर रुग्णालयाचा ‘डीपीआर’ सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST2021-02-06T04:12:37+5:302021-02-06T04:12:37+5:30

नागपूर : कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे रूपांतर ५६८ खाटांच्या अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) ...

DPR of Ambedkar Hospital submitted | आंबेडकर रुग्णालयाचा ‘डीपीआर’ सादर

आंबेडकर रुग्णालयाचा ‘डीपीआर’ सादर

नागपूर : कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे रूपांतर ५६८ खाटांच्या अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयात होऊ घातले आहे. १७ नवीन पदव्युत्तर व ७ अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाकडे प्रस्तावित आहे. शासनाच्या सूचनेनुसार मेयो प्रशासनाने या रुग्णालयाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एका खासगी संस्थेकडून तयार करण्यात आला. लवकरच हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर केला जाणार आहे.

विदर्भ व मध्य भारतात अतिविशेषोपचार सोयी वाढविण्याचा दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राच्या श्रेणीवर्धनासाठी अतिविशेषोपचार विभाग व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने ४ मार्च २०१४मध्ये घेतला होता. परंतु नंतर तो थंडबस्त्यात गेला. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तब्बल सहा वर्षांनी पुन्हा या केंद्राचा सुधारित प्रस्ताव मंत्रिमंडळात पाठविण्यात आला. प्रस्तावात कार्डियोलॉजी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी, न्यूरोसर्जरी, हृदयरोग शल्यचिकित्साशास्त्र, हिमॅटोलॉजी हे सहा अतिविशेषोपचार अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले आहेत. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमात औषध वैद्यकशास्त्र, बालरोग चिकित्साशास्त्र, त्वचा व गुप्त रोग, मनोविकृतीशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, रक्तपेढी, जीव रसायनशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगपोचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, नाक-कान-घसाशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, रुग्णालयीन प्रशासन, इमर्जन्सी मेडिसीन आदी सतरा अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत. यासाठी ७० पदव्युत्तर तर ४० सुपर स्पेशालिटी जागा निर्माण केल्या जाणार आहेत. या रुग्णालयाचा ‘डीपीआर’ तयार करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार मेयो प्रशासनाने एका खासगी संस्थेकडून हा अहवाल तयार केला. याला रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. रवी चव्हाण यांनी दुजोरा दिला.

Web Title: DPR of Ambedkar Hospital submitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.