दुबार पेरणीसाठी मदत करणार !
By Admin | Updated: July 11, 2014 01:22 IST2014-07-11T01:22:43+5:302014-07-11T01:22:43+5:30
पावसाने प्रदीर्घ उसंत घेतल्याने खरीप हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करण्याबाबत शासन

दुबार पेरणीसाठी मदत करणार !
पालकमंत्र्यांचे संकेत : २० टक्के क्षेत्रावरील पेरणी बुडणार
नागपूर : पावसाने प्रदीर्घ उसंत घेतल्याने खरीप हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करण्याबाबत शासन विचार करेल. याबाबत अंतिम निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मोघे बोलत होते. जिल्ह्यात ४ लाख ८५ हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत २ लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यापैकी २० टक्के क्षेत्रावरील पेरणी उलटण्याची शक्यता असून तेथे दुबार पेरणी करावी लागेल. २०१३ मध्ये १० जुलैपर्यंत २८३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत फक्त ९१ मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांची स्थिती नाजूक आहे.
सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई नसली तरी पुढच्या काही दिवसातही पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.
सध्या जिल्ह्यात १४ टँकर सुरू असून विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे, असे मोघे म्हणाले. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना शासन मदत करणार का? असा सवाल मोघे यांना केला असता राज्यभरातील परिस्थिती बघता शासन याबाबत विचार करू शकते. अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात दृष्काळसदृश्य स्थिती आहे. सरकारने यासंदर्भात सर्वेक्षण केले आहे. दुष्काळ जाहीर करण्याबाबत काही निकष आहेत. त्यानुसार शासन निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी नेहमीच शासनाने शेतकऱ्यांची मदत केली आहे.
प्रथम अतिवृष्टीसाठी व त्यानंतर गारपीट झाल्यावर अशी एकूण सात हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. टंचाईग्रस्त भागात करावयाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पावसाला विलंब झाल्याने त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन व विजय आदमने उपस्थित होते. (प्रतिनिधी)