संशय पुरावा ठरू शकत नाही

By Admin | Updated: May 29, 2014 03:29 IST2014-05-29T03:29:39+5:302014-05-29T03:29:39+5:30

संशयाला पुरावा म्हणून स्वीकारता येत नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई

Doubts can not be evidence | संशय पुरावा ठरू शकत नाही

संशय पुरावा ठरू शकत नाही

नागपूर : संशयाला पुरावा म्हणून स्वीकारता येत नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात केला आहे. न्यायालयाने याप्रकरणात सरकारी पक्ष संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे आरोपीची शिक्षा रद्द केली आहे.

सुदाम मोतीराम रानमाळे (४४) असे आरोपीचे नाव असून तो काळेगाव, जि. हिंगोली येथील रहिवासी आहे. बुलडाणा सत्र न्यायालयाने २९ एप्रिल २0११ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३0२ अंतर्गत आजन्म कारावास व १0 हजार रुपये दंड, कलम ३६३ व ३६४ अंतर्गत प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास व १000 रुपये दंड, तर कलम २0१ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व १000 रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली होती.

याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील स्वीकारून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

आरोपी सुदामच्या पत्नीचे नाव काशीबाई असून त्यांना निर्मला नामक मुलगी आहे. काशीबाईची नातेवाईक रेखा व तिचा पती संजय नलिंदेच्या वडिलांनी दिलीप लोखंडेसोबत निर्मलाचे लग्न लावून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. सुदाम या लग्नामुळे आनंदी नव्हता. यामुळे सुदाम व रेखाच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला होता.

३0 मार्च २0१0 रोजी इयत्ता दुसरीत असलेली रेखाची ८ वर्षीय मुलगी रोहिणी शाळेत गेली होती. तिच्या शाळेची वेळ सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंंत होती. यानंतर ती बराच वेळ घरी परतली नसल्याने संजय नलिंदेचा भाऊ राजेश शाळेत गेला. शाळेतील शिक्षक दत्तात्रय आखाडेने ४0 ते ४५ वर्षीय एक व्यक्ती सकाळी ९.३0 च्या सुमारास रोहिणीला सोबत घेऊन गेल्याचे सांगितले. हा व्यक्ती काळ्या रंगाचा आणि अंगात पांढरा सदरा व पायजमा घालून होता, अशी माहिती त्यांनी दिली. यावरून सुदामच रोहिणीला घेऊन गेल्याचा संशय आल्यानंतर संजय नलिंदेने दत्तात्रयला सुदामचे छायाचित्र दाखविले. दत्तात्रयने सुदामला ओळखले. यानंतर संजयने डोनगाव पोलीस ठाण्यात रोहिणी हरविल्याची तक्रार नोंदविली.

३१ मार्च रोजी काशीबाईने सुदाम परभणी रेल्वे स्टेशनवर भेटणार असल्याची माहिती दिली. सकाळी ११ वाजता सुदाम आला. तो दत्तात्रयला पाहून पळायला लागला, पण पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान सुदामने रोहिणीला वाशीम येथील अशोक जाधव नामक मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. पोलीस वाशीमला गेले असता अशोक चार-पाच दिवसांपासून घरी नसल्याचे कळले.

३ एप्रिल रोजी भारत काकडे नामक व्यक्तीने शेतातील विहिरीत एका मुलीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना दिली. तो मृतदेह रोहिणीचा होता. शवविच्छेदन अहवालात रोहिणीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने १६ साक्षीदार तपासले होते.(प्रतिनिधी)

Web Title: Doubts can not be evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.