अमरावतीत एकाच रात्री चार नवजात अर्भकांंचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: May 29, 2017 18:07 IST2017-05-29T18:07:51+5:302017-05-29T18:07:51+5:30
स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमसी) रविवारच्या मध्यरात्री एका पाठोपाठ एक चार शिशुंचा अकस्मात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

अमरावतीत एकाच रात्री चार नवजात अर्भकांंचा संशयास्पद मृत्यू
आॅनलाईन लोकमत
अमरावती : स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमसी) रविवारच्या मध्यरात्री एका पाठोपाठ एक चार शिशुंचा अकस्मात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेच्या काही तासांआधीपर्यंत सुखरूप व धडधाकट असलेले हे नवजात शिशू अकस्मात दगावल्याने पालकांचा रोष उफाळून आला. परिणामी पोलिसांना पाचारण करण्यात आले. तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चार मृत शिशुंपैकी तिघांच्या अंगावर लाल-काळे चट्टे आढळल्याने या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे. पीडीएमसीतील नवजात शिशू बालक अतिदक्षता कक्षात उपरोक्त चारही शिशुंना दाखल करण्यात आले होते. दोन मातांची प्रसूती खासगी इस्पितळात, तर दोघींची पीडीएमसीतच झाली होती. पालकांच्या मते प्रकृती उत्तम होती. मात्र, रविवार हा अवकाशाचा दिवस असल्याने सोमवारी सुटीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती. घटनेनंतर चारही मृत शिशुंची तपासणी केली असता आफरीन बानो हिचे बाळ ‘सेप्टिसिमिया’ नामक आजाराने दगावल्याचे स्पष्ट झाले. इतर तिघांच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. मध्यरात्रीपर्यंत सुस्थितीत असलेले शिशू दगावल्याने दु:खमिश्रित रोषाची भावना उफाळून आली होती. मुलांचा अकस्मात मृत्यू झालाच कसा, असा सवाल करीत मृत शिशुंच्या नातलगांनी पीडीएमसीच्या आवारात तसेच ‘डीन’कक्षात धुमाकूळ घातला. वाढता तणाव पाहता पोलिसांनी सोमवारी पहाटे तीनही शिशुंचे मृतदेह तत्काळ इर्विनमध्ये हलविले. तिन्ही मृतदेहांचे सोमवारी सकाळी पाच डॉक्टरांच्या चमूने विच्छेदन केले. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात आले. यावेळी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नवजात शिशू-बालक अतिदक्षता कक्षातील सीसीटीव्हीची फुटेज पोलिसांनी जप्त केले असून त्याआधारे घटनेचा तपास केला जाईल.
चौकशी समिती स्थापन
प्रकरणाच्या चौकशीकरिता पीडीएमसी प्रशासनाने वरिष्ठ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक सोमेश्वर निर्मळ यांच्यासह डॉ. लवणकर, प्रतिभा काळे, पंकज बारब्दे यांच्यासह अन्य काही डॉक्टरांची समिती गठित करण्यात आली. चौकशी अहवाल २४ तासांच्या आत सादर करण्याचे आदेश अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी दिले आहेत.
चार नवजात शिशुंचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा ‘सेफ्टीसिमीया’ने मृत्यू झाला तर अन्य तिघांच्या मृत्युचे कारण अज्ञात आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांकडे सोपविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृत्युचे निश्चित कारण कळेल. तपासासाठी चौकशी समिती गठित केली असून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. -
दिलीप जाणे, अधिष्ठाता, पीडीएमसी.
शिशुंच्या मृत्युचे निश्चित कारण सध्या सांगता येणार नाही. शवविच्छेदन अहवालानंतर ते स्पष्ट होईल. शवविच्छेदनाचे चित्रिकरण केले. पीडीएमसी प्रशासनाच्या चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल. -
अरूण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती