सोनेगावात दुहेरी हत्याकांड
By Admin | Updated: November 19, 2015 03:20 IST2015-11-19T03:20:17+5:302015-11-19T03:20:17+5:30
दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दुहेरी हत्याकांडात झाले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थ नगरात मंगळवारी रात्री हा थरार घडला.

सोनेगावात दुहेरी हत्याकांड
दगडाने ठेचून हत्या इंद्रप्रस्थ नगरात थरार मनोज भारद्वाजला अटक
नागपूर : दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दुहेरी हत्याकांडात झाले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थ नगरात मंगळवारी रात्री हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोज भारद्वाज याला अटक केली. या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
बुधवारी सकाळी इंद्रप्रस्थ नगरातील रेल्वेलाईन डम्पिंग यार्डजवळ दोन तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. सकाळी ८ च्या सुमारास माहिती कळाल्यानंतर सोनेगाव पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. दोन्ही तरुणांची दगडाने तसेच सिमेंटच्या फळीने ठेचून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी गर्दीतील लोकांना मृतांबाबत विचारणा केली असता ते बंटी ऊर्फ संदीप शरद आटे (वय २५, रा. तुकडोजीनगर) आणि रवी प्रकाश टुले (वय २६, रा. गोपालनगर) यांचे मृतदेह असल्याचे गर्दीतील लोकांनी सांगितले. पोलिसांनी लगेच दोघांच्याही घरच्यांना बोलवून घेतले. कुटुंबीयांनी ओळख पटविल्यानंतर मृतदेह मेडिकलला पाठविण्यात आले. दरम्यान, दुहेरी हत्याकांडाची माहिती कळताच सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त शैलेश बलकवडे, रंजन शर्मा, सहायक आयुक्त तोरे, सोनेगावचे ठाणेदार अरुण महाजन यांनीही घटनास्थळी धाव घेतली. हे हत्याकांड घडविणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केला. (प्रतिनिधी)
‘तिची’ही चौकशी होणार
आपल्याला ते मारणार होते, त्यामुळे आपण एकट्यानेच त्यांना मारल्याचे मनोजने पोलिसांना सांगितले. दरम्यान, बंटी आणि रवी दोघेही धडधाकट होते. त्यांना एकटा मनोज मारूच शकत नाही, असा पोलिसांना विश्वास आहे. त्यामुळे तो आपल्या साथीदाराला वाचविण्यासाठी स्वत:वर हत्येचा आरोप घेत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याला बोलते करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या प्रेयसीलाही ठाण्यात बोलवले. तिच्या चौकशीतून या हत्याकांडाशी जुळलेल्या काही बाबींचा उलगडा होण्याचा पोलिसांना विश्वास आहे.
अभ्भी मर्डर करके आरहा हूं...
हे हत्याकांड घडविणाऱ्या आरोपी मनोजमध्ये सैतान संचारल्यासारखा झाला होता. बराच वेळ तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बंटी आणि रवीच्या मृतदेहाशेजारी बसला. बाजूचे अनेक दगड, फळ्या उचलून त्याने मृतांच्या डोक्यात घातल्या. त्यानंतर त्याने घराकडे जाताना अनेकांना अडवून मारहाण करण्याचे प्रयत्न केले. त्याला एक मित्रही दिसला. त्याला ‘अभ्भी डबल मर्डर करके आ रहा हूं...’ असे म्हणत मारण्याचा प्रयत्न केला. त्याचे ते रूप पाहून त्याचा मित्रही शहारला होता. बुधवारी सकाळी त्याने पोलिसांना आरोपीच्या रात्रीच्या सैतानी वृत्तीचा प्रकार ऐकवला.
अनैतिक संबंध मुळाशी
मृत रवी आॅटोचालक होता. बंटी कुख्यात चेनस्रॅचर तर आरोपी मनोज मिहानमध्ये एका खासगी कंपनीत कामाला आहे. हे तिघेही मित्र होते. रवीचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध आहे. या महिलेने रवीच्या प्रेमात पडून त्याला तिची प्लेझर भेट दिली होती. जवळ आॅटो असल्यामुळे रवी प्लेझरचा फारसा वापर करीत नव्हता. त्यामुळे त्याने ही दुचाकी मनोजला वापरण्यासाठी दिली. दोन आठवड्यांपूर्वी रवीला आॅटोच्या कर्जाचा हप्ता भरायचा होता. त्यामुळे मनोजकडून त्याने दुचाकी परत घेऊन ती सावकाराकडे गहाण ठेवली. दरम्यान, प्रेयसीला तिची दुचाकी मनोजकडे दिसल्याने ती भडकली. तिने रवीकडे दुचाकी परत मागण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे रवी अस्वस्थ झाला. आपल्या प्रेयसीला मनोजनेच भडकवले असावे, असा त्याला संशय आला. त्यामुळे जाब विचारण्यासाठी मंगळवारी दिवसभर रवी मनोजला शोधत होता. रात्री तो नेहमीच्या ठिय्यावर अन्य मित्रांसोबत जुगार खेळत असल्याचे त्याला कळले. त्यामुळे रवी घटनास्थळी पोहचला. तेथे तो, बंटी, मनोज आणि अन्य चार असे सात जण बराच वेळ दारू पीत बसले. रात्री ११ च्या सुमारास रवीने मनोजला ‘दुचाकी आणि प्रेयसी‘चा विषय काढून जाब विचारला. त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. दोघेही एकमेकांना मारत असल्याचे पाहून तिघे तेथून सटकले. मनोजने रागाच्या भरात सिमेंटची फळी उचलून रवीकडे धाव घेतली. ते पाहून बंटी मध्ये आला. रवीला मारशील तर चांगले होणार नाही, असा बंटीने इशारा दिला. त्यामुळे मनोजने रवीला सोडून सिमेंटची फळी बंटीच्या डोक्यात घातली. एकाच फटक्यात बंटी जमिनीवर पडून तडफडू लागला. आरोपी मनोजने नंतर रवीला खाली पाडून दगडाने ठेचणे सुरू केले. ते पाहून या तिघांचा मित्र तेथून पळून गेला. हत्या केल्यानंतर आरोपी आपल्या घरी जाऊन झोपला.
तासाभरातच झाला उलगडा
मंगळवारी रात्री घटनास्थळाजवळ बंटी आणि रवीसोबत मनोज भारद्वाज दारू पीत बसला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी मनोजचे घर गाठून त्याला ताब्यात घेतले. त्याचे रक्तरंजित कपडे आणि शरीरावर ठिकठिकाणी जमलेले रक्ताचे डाग पाहून तोच आरोपी असल्याची खात्री पोलिसांना पटली. पोलीस ठाण्यात आणून ठोकपीट केल्यानंतर त्याने या हत्याकांडाची कबुली दिली.