एसीबीचा डबल धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:09 IST2021-06-09T04:09:45+5:302021-06-09T04:09:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - एसीबीच्या पथकाने मंगळवारी कारवाईचा डबल धमाका केला. एकीकडे महापालिकेच्या वरिष्ठ लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ ...

एसीबीचा डबल धमाका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - एसीबीच्या पथकाने मंगळवारी कारवाईचा डबल धमाका केला. एकीकडे महापालिकेच्या वरिष्ठ लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या तर, दुसरीकडे वाहतूक शाखेच्या पोलिसाला लाच मागण्याच्या आरोपाखाली जेरबंद केले. एसबीने एकाच दिवशी दोघांच्या विकेट घेतल्याने लाचखोरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून सेवा देणारे तक्रारदार ३१ मार्चला निवृत्त झाले. त्यांना नंतर आजाराने घेरले. निवृत्तीनंतर त्यांची पत्नी निवृत्ती वेतन आणि इतर हक्काचे लाभ मिळावे म्हणून धरमपेठ झोन २ च्या आरोग्य विभागातील वरिष्ठ लिपिक राजेंद्र शंकरराव गजभिये (वय ५५) यांच्याकडे चकरा मारू लागली. निवृत्ती वेतनासोबतच शिल्लक सुट्यांचे पैसे वाढवून देण्याची बतावणी करून गजभियेने या महिलेला ३ जून रोजी १० हजाराची मागणी केली.
विशेष म्हणजे, महिलेचे पती (निवृत्त कर्मचारी) आजारामुळे अंथरुणाला खिळले आहे. तर, सदर महिला नुकतीच कोरोनातून बरी झाल्याने त्यांची तीव्र आर्थिक कोंडी झाली आहे. आमच्यासाठी १० हजाराची रक्कम खूप जास्त आहे, असे सांगून तिने गजभियेला आपल्या हक्काचे लाभ तातडीने मिळावे, यासाठी मागणी केली. मात्र, गजभिये लाचेच्या रकमेसाठी अडून बसला होता. त्यामुळे पीडित महिला सरळ एसीबीत पोहचली. तिची तक्रार ऐकून घेतल्यानंतर एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी उपअधीक्षक योगिता चाफले यांना शहानिशा करण्याचे आदेश दिले. चाफले यांनी आज मंगळवारी तक्रारीची शहानिशा केली.
---
अन् गजभिये अडकला।
गजभिये लाचेची रक्कम मागत असल्याचे स्पष्ट झाल्याने अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात आज कारवाईचा सापळा लावला. त्यानुसार, उपअधीक्षक योगिता चाफले यांच्या नेतृत्वात नायक रविकांत डहाट, अनमोल मनघरे, आँचल हरगुळे, अस्मिता मेश्राम आणि प्रिया नेवरे यांनी दुपारी ४ वाजता गजभियेचे कार्यालय गाठले. ठरल्याप्रमाणे महिलेने गजभियेला लाचेचे १० हजार रुपये दिले. त्याने ते स्वीकारताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गजभियेविरुद्ध अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिकडे एका पथकाने त्याच्या घराचीही झडती घेतली. त्यात फारसे काही हाती लागले नसल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले.
---
ऑटोचालकाने घेतली
‘ऑन डिमांड विकेट’
दुसरी कारवाई प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तक्रारदाराच्या ऑटोला १० मे रोजी शंकरनगर चाैकाजवळ एका ॲम्ब्युलन्सची धडक बसली होती. त्यावेळी ऑटोचे मोठे नुकसानही झाले होते. अशात पोलीस शिपाई बिपीन शंकरराव महाजन (वय ३२) याने ऑटोचालकाला ५०० रुपयाची लाच दे अन्यथा तुझा ऑटो चेंबरला लावून २ हजाराच्या दंडाची कारवाई करेन, अशी धमकी दिली होती. त्यावेळी २०० रुपयाचे चालानही कापले होते. महाजन ५०० रुपयाच्या लाचेसाठी कारवाईची सारखी धमकी देत असल्याने आठ दिवसापूर्वी ऑटोचालकाने त्याच्याविरुद्ध एसीबीकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कारवाईचा सापळा लावला. मात्र, संशय आल्यामुळे महाजन लाचेची रक्कम घेण्यास टाळाटाळ करू लागला. तो लाचेची रक्कम स्वीकारणार नाही, हे लक्षात आल्यामुळे एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी आरोपी महाजनविरुद्ध लाच मागण्याची (ऑन डिमांड) कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, मंगळवारी दुपारी उपअधीक्षक नरेश पार्वे यांच्या नेतृत्वात लक्ष्मण परतेती, भागवत वानखेडे, सचिन किन्हेकर आणि शारिक शेख यांनी लाचखोर महाजनला जेरबंद केले.
----