'केवळ स्वप्न बघू नका, स्वप्नांचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2023 21:02 IST2023-02-11T21:02:19+5:302023-02-11T21:02:53+5:30
Nagpur News कुठलेही करिअर करताना केवळ स्वप्न बघू नका, स्वप्नांचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवा, असा सल्ला आयएएस सत्यम गांधी यांनी व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांना दिला.

'केवळ स्वप्न बघू नका, स्वप्नांचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवा'
नागपूर : लाखो युवक दरवर्षी यूपीएससीची परीक्षा देतात आणि बोटावर मोजण्याइतके परीक्षा क्रॅक करतात. केवळ स्वप्न बघून आयएएस होता येत नाही. त्यासाठी स्वप्नांचा पाठलाग करण्याची क्षमता स्वत:मध्ये विकसित करावी लागते. स्वप्नांचा पाठलाग करताना अनेक आनंदी क्षणांचा चुराडा करावा लागतो. तेव्हाच आयएएस बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरते. त्यामुळे कुठलेही करिअर करताना केवळ स्वप्न बघू नका, स्वप्नांचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवा, असा सल्ला आयएएस सत्यम गांधी यांनी व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांना दिला.
व्हीएनआयटीच्या टीईडीएक्स चाप्टरद्वारे व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी सत्यम गांधी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी व्हीएनआयटीचे अधिष्टाता डॉ. दिलीप लटाये व डॉ. कार्तिक बालासुंदर यावेळी उपस्थित होते. यावेळी सत्यम गांधी यांनी यशाचा संघर्षमय प्रवास आणि त्यासाठी केलेला त्याग विद्यार्थ्यांपुढे मांडला. बालपणापासूनच आजोबांनी अधिकारी बनण्यासाठी माझ्यात बीज रोवले. सैन्यात अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितले होते. त्यासाठी सैन्याची परीक्षाही उत्तीर्ण झाले; पण फिजिकलमध्ये अपात्र ठरलो. तेव्हा दुसरा विकल्प आयएएसचा निवडला. त्यासाठी संघर्ष केला. नातेवाईकांचे टोमणे सहन केले, मित्रांकडून टोमणे खाल्ले. फोटोग्राफीचा आवडता छंद सोडून दिला. लग्न, उत्सव, मित्रांच्या पार्टी सर्वांना पाठ दाखविली. सोशल मीडियाला दूर केले. ध्येय ठेवले होते की पहिल्याच टर्ममध्ये यूपीएससी क्रॅक करण्याचे. मेहनतीतून ते स्वप्न पूर्णत्वास आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी भोंडवे यांनी केले. निशांत वर्णेकर यांनी आभार मानले.