तरुणांच्या सजगतेने श्वानाला मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST2021-09-26T04:08:24+5:302021-09-26T04:08:24+5:30
- स्वयंसेवी संस्थेने तातडीने घेतला पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माणसातील माणूसपण ते त्याच्यातील सजगतेमुळेच सिद्ध होते. अशीच ...

तरुणांच्या सजगतेने श्वानाला मिळाले जीवनदान
- स्वयंसेवी संस्थेने तातडीने घेतला पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माणसातील माणूसपण ते त्याच्यातील सजगतेमुळेच सिद्ध होते. अशीच सजगता काही तरुणांनी दाखवली आणि आजारी व भुकेल्या श्वानाला, जीवनदान मिळाले.
खरबी चौक येथील गोस्वामी डेअरीजवळ एक श्वान रस्त्याच्या मधोमध निपचित पडला होता. येथून जाणाऱ्या जड वाहनांमध्ये येऊन चिरडण्याची शक्यता होती. आजूबाजूचे बघे, त्याला हटकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तो आजारी असल्याने कसलाही प्रतिसाद देत नव्हता. अशात प्रणय गुप्ता व अन्य दोन तरुणींच्या नजरेस हा श्वान पडला. तातडीने त्यांनी त्या श्वानाला उचलून नजिकच्या भिंती शेजारी ठेवले. त्याला पाणी पाजले. मात्र, तो प्रतिसाद देत नव्हता. त्यानंतर त्यांनी तात्काळ ॲनिमल सर्व्हायवर चळवळीतील स्मिता मिरे यांना संपर्क साधला. त्यांची टीम आधीच पारडी येथे एका श्वानाला ताब्यात घेण्याच्या कामात व्यस्त होती. मात्र, तरुणांच्या या फोनला तात्काळ उत्तर देत, तेथे त्यांची टीम पोहोचली आणि त्याला शेल्टर होममध्ये नेले. आता तो श्वान तज्ज्ञांच्या देखरेखित शेल्टर होममध्ये उपचार घेत आहे.
------------
प्राणिमात्रांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य
श्वान हे आपल्याच सामाजिक जीवनातील महत्त्वाचा प्राणी आहे. अनेक जण ते पाळतात. मात्र, त्याला आजार जडला की वाऱ्यावर सोडतात. रस्त्यावर कुठेही ते जगत असतात. अशा वेळी काहीशी संवेदना दाखवली तर ते जगू शकतात आणि त्यांचे नियोजन होऊ शकते. आम्ही तेच केले.
- प्रणय गुप्ता, तरुण
...............