कोरोना फक्त पॅसेंजरमधुनच पसरतो का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:24+5:302021-07-19T04:06:24+5:30
नागपूर : कोरोनामुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. कोरोनाची दुसरी लाटही ओसरली आहे. ...

कोरोना फक्त पॅसेंजरमधुनच पसरतो का ?
नागपूर : कोरोनामुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. कोरोनाची दुसरी लाटही ओसरली आहे. तसेच विशेष रेल्वेगाड्यातही प्रवाशांची खचाखच गर्दी होत असून नियमित रेल्वेगाड्या आणि पॅसेंजर सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. परंतु रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष रेल्वेगाड्यातही प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे पॅसेंजर रेल्वेगाड्यातूनच कोरोना पसरतो काय, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत.
सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्या
अ) ०२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ विशेष रेल्वेगाडी
ब) ०२१३६ नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडी
क) ०२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम विशेष रेल्वेगाडी
ड) ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो विशेष रेल्वेगाडी
इ) ०१०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र विशेष रेल्वेगाडी
बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वेगाड्या
अ) नागपूर-भुसावळ पॅसेंजर
ब) नागपूर-आमला पॅसेंजर
क) इतवारी-टाटानगर पॅसेंजर
ड) नागपूर-काजीपेठ पॅसेंजर
इ) नागपूर-इटारसी पॅसेंजर
पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू कराव्यात
‘नियमित रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे विशेष रेल्वेगाड्यात प्रवाशांना अधिक पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेने पॅसेंजर आणि नियमित रेल्वेगाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे.’
-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र
एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नाही
‘रेल्वेने कोरोनामुळे नियमित रेल्वेगाड्या बंद केल्या. परंतु विशेष रेल्वेगाड्यात प्रवाशांना १०० ते २०० रुपये अधिक प्रवासभाडे द्यावे लागते. त्यामुळे एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नसल्याने रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू कराव्यात.’
-विशाल कांबळे, प्रवासी
विशेष रेल्वेगाड्यातही होत आहे गर्दी
‘कोरोनामुळे रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. परंतु या विशेष रेल्वेगाड्यातही प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्यातच गर्दी होते ही चुकीची कल्पना असून रेल्वेने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करुन प्रवाशांना दिलासा द्यावा.’
-राकेश लांडे, प्रवासी
पॅसेंजर गाड्या सुरू करणे धोरणात्मक निर्णय
‘कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पॅसेंजर गाड्या बंद करून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करणे हा धोरणात्मक निर्णय आहे. रेल्वे मुख्यालयाकडून आदेश आल्यानंतर पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यात येतील.’
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग
..........