कोरोना काळात घटले डॉक्टरांचे वजन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST2021-05-25T04:07:49+5:302021-05-25T04:07:49+5:30
नागपूर : कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांचे अस्तित्व किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव प्रत्येकालाच झाली आहे. अनेकांसाठी डॉक्टर देवदूत ठरत ...

कोरोना काळात घटले डॉक्टरांचे वजन !
नागपूर : कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांचे अस्तित्व किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव प्रत्येकालाच झाली आहे. अनेकांसाठी डॉक्टर देवदूत ठरत आहे. विशेषत: शासकीय रुग्णालयात मागील १४ महिन्यांपासून सामान्यांसह तळागळातील गोरगरीब रुग्णांपर्यंत आरोग्यसेवा देण्यासाठी येथील डॉक्टर इतरांसाठी प्रेरक ठरत आहेत. कोविड व नॉनकोविड रुग्णांना सेवा देतानाच्या धावपळीत अनेक डॉक्टरांचे वजन कमी झाले आहे. काहींनी स्वत:ला ‘फिट’ ठेवण्यासाठी व्यायाम व योग्य आहारातून वजन कमी केल्याचेही दिसून येत आहे.
आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीमुळे सर्वसाधारण व्यक्तीचे आयुष्यमान सरासरी वाढलेले असताना डॉक्टरांचे आयुष्यमान मात्र खाली आल्याचे वैद्यकीय क्षेत्रातीलच तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषत: कोरोनाकाळात शासकीय रुग्णालयात ओपीडीत रुग्णांची तपासणी, वॉर्डातील राउंड, ऑपरेशन्स, रुग्णांचे व्यवस्थापन आदींमुळे निर्माण होणारे वातावरण शारीरिक, मानसिक आणि भावनिक थकवा आणणारे आहे. यात मागील दीड वर्षापासून कोरोना रुग्णांना सेवा देत स्वत:ची काळजी घेणाऱ्या अनेक डॉक्टरांचे वजन कमी झाल्याचे किंवा त्यांनी ते कमी केल्याचे दिसून येत आहे.
-कोरोनाकाळात स्वत:कडे दुर्लक्ष झाले
मेडिकलच्या मेडिसिन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विनोद खंडाईत म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक रुग्णांचा भार आजही मेडिकलवर आहे. यामुळे येथील प्रत्येक डॉक्टर रुग्णसेवेत व्यस्त आहे. कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळत रुग्णसेवा देताना दमछाक होत आहे. एकदा पीपीई किट घातल्यानंतर तीन ते चार तास पाणीही पिता येत नाही. अवेळी जेवण, रात्री-बेरात्री रुग्णाच्या व्यवस्थापनामुळे ताण वाढला आहे. यातून स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वजन कमी झाले आहे.
-व्यस्त शेड्यूलमध्येही आरोग्याकडे लक्ष
मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, आशिया खंडातील सर्वांत मोठे दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय म्हणून मेडिकलची ओळख आहे. अशा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी २४ तासही कमी पडतात, अशी स्थिती आहे. कोरोनाच्या या दीड वर्षाच्या कालावधीत रुग्ण व रुग्णालयाचे व्यवस्थापन सांभाळण्याचा सर्वांत व्यस्त कालावधी असतानाही स्वत:कडे दुर्लक्ष केले नाही. नियमित व्यायाम व आहाराकडे विशेष लक्ष दिले. परिणामी, वजन कमी झाले.
-फिट असल्याने २४ तास रुग्णसेवेला देत आहे
मेयोचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे म्हणाले, विदर्भच नव्हे, तर आजूबाजूच्या राज्यातील रुग्णांसाठी मेयो आशेचे केंद्र ठरले आहे. कोरोनाच्या या १४ महिन्यांचा कालावधीत अनेक समस्यांना तोंड देत रुग्णांचे व्यवस्थापन केले. दिवस-रात्र रुग्णसेवेच्या धावपळीमुळे वजन कमी झाले असले तरी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले नाही. नियमित व्यायाम व योग्य आहार घेत ‘फिट’ असल्यामुळेच आजही २४ तास रुग्णसेवेत देत आहे.
-संतुलित आहाराकडे लक्ष
कोरोनाकाळात पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. निरोगी आयुष्यासाठी आहारात पौष्टिक घटक आणि आवश्यक जीवनसत्त्वांचा समावेश करणे गरजेचे असल्याने मेयो, मेडिकलचे बहुसंख्य डॉक्टर आपल्या संतुलित आहाराकडे विशेष लक्ष देत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून जाणवले.