डॉक्टरांचा संप मागे
By Admin | Updated: August 24, 2014 01:10 IST2014-08-24T01:10:51+5:302014-08-24T01:10:51+5:30
सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रु ग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून येथील निवासी डॉक्टर किरण जाधव याने पाच दिवसांपूर्वी आत्महत्या केली. याच्या निषेधात मेडिकल

डॉक्टरांचा संप मागे
मेडिकल, मेयो : रुग्णसेवा प्रभावित
नागपूर : सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रु ग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून येथील निवासी डॉक्टर किरण जाधव याने पाच दिवसांपूर्वी आत्महत्या केली. याच्या निषेधात मेडिकल आणि मेयोच्या निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने शनिवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. या दोन्ही रुग्णालयातील सुमारे ४५० निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली होती.
गर्दीने ओसंडून वाहणारे मेडिकल व मेयातील निवासी डॉक्टर अचानक शनिवारी सकाळपासून संपावर गेले. यामुळे गरीब रु ग्ण अडचणीत आला. जिथे सहा डॉक्टर विभाग सांभाळत होते तिथे एक किंवा दोन वरिष्ठ डॉक्टरांवर ही जबाबदारी देण्यात आली होती. यामुळे गंभीर आजाराच्या रुग्णांसोबतच सामान्य रुग्णांना याचा मोठा फटका बसला. निवासी डॉक्टर हा मेडिकल आणि मेयोचा कणा आहे. हा कणाच नसल्याने या दोन्ही रुग्णालयातील ७० टक्के रुग्णसेवा प्रभावित झाली होती.
मेडिकल मॉर्डचे अध्यक्ष डॉ. आयुध मगदूत यांनी सांगितले, डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांना नेहमी येणाऱ्या अडचणी तीव्रपणे समोर आल्या आहेत. वेळोवेळी समस्या मांडूनही शासन याकडे लक्ष देत नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत.
म्हणूनच हा एक दिवसाचा ‘कॉमन बंक’ आम्ही पुकारला. मार्डचे सचिव डॉ. नोव्हील ब्राम्हणकर म्हणाले, निवासी डॉक्टरांचे कामाचे तास, कमी असलेले मनुष्यबळ, थेसीसच्या नावाखाली दिला जाणारा त्रास या गोष्टींवर शासन उपाय करीत नाही. यामुळे डॉक्टरांमध्ये वैफल्य निर्माण होऊन असे प्रकार घडतात. शासनाने यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
दरम्यान सकाळी मेयोच्या मार्ड संघटनेचे सचिव डॉ. जितेश शेरकुरे व उपाध्यक्ष डॉ. कुंतल सुराणा यांच्या उपस्थितीत डॉ. जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येत निवासी डॉक्टर उपस्थित होते. (प्रतिनिधी)