डॉक्टरांच्या वय वाढीची शक्यता कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:51+5:302020-12-02T04:07:51+5:30
नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाने रिक्त पदे व त्याचा रुग्णसेवेवर होणार परिणाम विचारात घेऊन रुग्णसेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे ...

डॉक्टरांच्या वय वाढीची शक्यता कमीच
नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाने रिक्त पदे व त्याचा रुग्णसेवेवर होणार परिणाम विचारात घेऊन रुग्णसेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ आणि जे प्रशासनिक सेवेमध्ये आहेत त्यांचे वय ५८ वरून ६० करण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये घेतलेल्या या निर्णयामुळे मे २१ मध्ये ६० व ६२ वर्षे गाठणाऱ्या काही अधिकाऱ्यांना आतापासून वय वाढीचे वेध लागले आहे. परंतु शासन याबाबत उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक वरिष्ठांना घरी जावे लागण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली येणारे संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय आणि राज्य कामगार विमा योजना कार्यालयातील संचालक (वैद्यकीय), वैद्यकीय अधीक्षक आदी प्रशासानिक सेवेतील अधिकाऱ्यांचे वय ५८ वरून ६० करण्यात आले. हा निर्णय ३१ मे २०२३ पर्यंत कायम असणार आहे. परंतु या पदावरील अधिकारी वगळता जे वैद्यकीय अधिकारी थेट रुग्णसेवेशी निगडित आहेत त्याच अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरुन ६२ करण्यात आले. परंतु याची मुदत दोन वर्षांसाठी, म्हणजे, ३१ मे २०२१ पर्यंतच देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षे वाढीचा हा निर्णय ३१ मे २०१९ रोजी घेतला. यामुळे याचा फायदा मागील वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्यांना झाला. आता पुढील वर्ष वयाची साठी गाठणाऱ्यांसाठी शासनाच्या सेवेतील शेवटचे आहे. यातील काहींनी वय वाढविण्यासाठी हालचालींना वेग आणल्याचे बोलले जात आहे. परंतु नुकतेच एका प्रकरणात उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने एक निर्णय दिला आहे. त्यावरून शासनाने एक पत्र काढले आहे. यात सद्यस्थितीत वयवाढीबाबतच्या प्रचलित शासन निर्णयानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे वय वाढीची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
- प्रत्येक जिल्ह्यातून पाच ते सात अधिकारी सेवानिवृत्त
वयाची ६० किंवा ६२ पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास पाच ते सात अधिकारी सेवानिवृत्त होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, दोन मेडिकल ऑफिसर यांच्यासह काही अधिकारी आहेत.