डॉक्टर पत्नीने केली पतीची हत्या
By Admin | Updated: December 1, 2015 07:06 IST2015-12-01T07:06:58+5:302015-12-01T07:06:58+5:30
रागाच्या भरात बेभान झालेल्या पत्नीने नवऱ्याच्या छातीवर बसून त्याचे हृदय चाकूने छेदले. त्यामुळे पतीचा लगेच

डॉक्टर पत्नीने केली पतीची हत्या
छातीवर बसून घातले घाव : उदयनगर चौकाजवळील थरार
नागपूर : रागाच्या भरात बेभान झालेल्या पत्नीने नवऱ्याच्या छातीवर बसून त्याचे हृदय चाकूने छेदले. त्यामुळे पतीचा लगेच मृत्यू झाला. रविवारी रात्री ११.१५ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. विशेष म्हणजे, आरोपी पत्नी पेशाने दंत चिकित्सक आहे. टिष्ट्वंकल रविकांत उके (वय ४०) असे तिचे नाव असून, पोलिसांनी तिला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
मानेवाडा रिंगरोडवर उदयनगर चौकाजवळ श्रीरामनगर आहे. तेथे सिंचन विभागाचे निवृत्त अभियंता मधुकर रामचंद्र उके यांचे दुमजली निवासस्थान आहे. खाली मधुकर आणि त्यांची पत्नी मृदुलता (वय ६७) राहतात. तर, पहिल्या माळ्यावर मुलगा रविकांतचा परिवार राहात होता. रविकांत आणि टिष्ट्वंकलला रुजल नामक आठ वर्षांचा मुलगा आहे.
रविकांत पोलिओग्रस्त होता. तो पॅथालॉजी चालवायचा. तेथेच त्याची पत्नी टिष्ट्वंकलचे छोटेसे दंत क्लिनिक होते. ती शीघ्रकोपी स्वभावाची होती. स्वत: कमवत असल्यामुळे पतीची कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायला ती तयार नव्हती. सारखी चिडचिड करायची. ती चांगली वागत नसल्यामुळे रविकांतने दुसराच अर्थ काढला होता. तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून दोघांमध्ये नेहमीच खटके उडायचे. रविकांत पोलिओग्रस्त असल्यामुळे ती त्याच्यावर हावी व्हायची. रविवारी घटनेच्या वेळी टिष्ट्वंकलचे वडील तिच्या घरी आले होते. रात्री सासऱ्याशी बोलताना रविकांतने पत्नी नीट वागत नसल्याची तक्रार केली. त्यामुळे या दोघांमध्ये वाद वाढला. आपल्या वडिलांसमोर अपमानास्पद शब्द काढत असल्याचे पाहून ती रविकांतचा पाणउतारा करू लागली. शब्दाने शब्द वाढले. यावेळी रवी पलंगावर लेटला होता. टिष्ट्वंकलने घरातील चाकू हातात घेतला आणि रविकांतच्या छातीवर बसून त्याच्या वर्मी घाव घातले. छाती, पोटावर एका पाठोपाठ अनेक घाव घातल्याने रविकांतने किंकाळी फोडली. ती ऐकून त्याचे आईवडील वर धावले. रविकांत रक्ताच्या थारोळळ्यात पडून होता. तर, आरोपी टिष्ट्वंकलच्या हातात चाकू होता. मृदुलता यांनी तिच्याकडे धाव घेत चाकू पकडला.
टिष्ट्वंकलच्या कृत्याबद्दल संताप
४माहिती कळाल्यामुळे सोमवार सकाळपासूनच उके यांच्या आप्तस्वकीयांसह मोठ्या संख्येत आजूबाजूची मंडळी घटनास्थळी जमली. प्रत्येक जण टिष्ट्वंकलच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त करीत होता. तिच्या वर्तणुकीमुळे तिचे कुणाशी पटत नव्हते, असे सांगत होता. उके परिवार शांत आणि संयमी स्वभावाचा होता. त्यांच्याकडे कधीही कोणता वाद होत नव्हता. मात्र, टिष्ट्वंकल घरात आल्यापासून या घरात नेहमीच आदळआपट व्हायची. ती रविकांतला नेहमीच मारायची. सासूलाही तिने एकदा विटेने मारले होते. यामुळे तिच्यापासून शेजारीही चार हात दूरच राहात होते, असे घटनास्थळावरची मंडळी सांगत होते.