डॉक्टरांनी सामाजिक कर्तव्याचे भान ठेवावे

By Admin | Updated: December 7, 2015 06:46 IST2015-12-07T06:46:12+5:302015-12-07T06:46:12+5:30

आपला देश आरोग्याला घेऊन अडचणींना तोंड देत आहे. यामुळे प्रत्येक डॉक्टराने सामाजिक कर्तव्याचे भान

Doctor should keep a consciousness of social duty | डॉक्टरांनी सामाजिक कर्तव्याचे भान ठेवावे

डॉक्टरांनी सामाजिक कर्तव्याचे भान ठेवावे

नागपूर : आपला देश आरोग्याला घेऊन अडचणींना तोंड देत आहे. यामुळे प्रत्येक डॉक्टराने सामाजिक कर्तव्याचे भान राखल्यास अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकेल. ग्रामीण भागात आजही तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. याकडे शासन लक्ष देत असले तरी डॉक्टरांनी स्वत:हून पुढाकार घेण्याची गरज आहे. नव-नवीन संशोधनाकडे डॉक्टरांनी लक्ष देऊन त्याचा लाभ तळागळातील लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
कोमहाड, सीएचपीए, अकॅडमी आॅफ पिडीयाट्रीक्स (नागपूर) युनिसेफ, वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस) यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांच्या अपंगत्वावर ‘कोमहाड -२०१५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी रामदासपेठ येथील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित या परिषदेच्या औपचारिक उद्घाटनाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी अस्थिव्यंग असलेल्या दोन मुलांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार डॉ. मिलिंद माने, ‘कोमहाड’ समितीचे अध्यक्ष व प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, प्रा. एमडीसीरजल इस्लाम, प्रा. राजाराम पगडाला, प्रा. सॅम लिंगम, परिषदेचे आयोजन सचिव डॉ. यशवंत पाटील, डॉ. सुचीत बागडे, डॉ. वसंत खळतकर, डॉ. आर.जे. पाटील, डॉ. गिरीश चरडे आदी उपस्थित होते.
बडोले म्हणाले, समाजात आजही डॉक्टरांना ईश्वराचा दर्जा दिला जातो. यामुळे त्यांनी याच भावनेतून रुग्णसेवा द्यायला हवी. प्रगत देशात विशेष मुलांना अपंग म्हणणेही चुकीचे ठरते. अशा मुलांसाठी त्यांच्याकडे अनेक सोयी उपलब्ध आहेत. परंतु आपण आजही या संदर्भात केवळ चर्चेपुरतेच मर्यादित आहोत. आपल्या शाळांमध्ये अस्थिव्यंग असलेल्या मुलांसाठी अद्यापही सोयी नाहीत.
अशा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा, असेही ते म्हणाले. आ. डॉ. माने यांनी, परिषदेचे कौतुक करीत, अशा परिषदेच्या माध्यमातून नवनवीन ज्ञानात भर पडते, सरकार अपंग मुलांच्या उज्ज्वल भविष्येसाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक डॉ. यशवंत पाटील यांनी केले. स्वागतपर भाषण डॉ. उदय बोधनकर यांनी केले. संचालन डॉ. राजीव मेहता व डॉ. स्मिता देसाई यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सॅम लिंगम, डॉ. प्रकाश सागवी, डॉ. उदय बोधनकर, डॉ. विरल कामदार आणि डॉ. सरिता आमदार यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Doctor should keep a consciousness of social duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.