बोगस डॉक्टरांकडून सर्रास रुग्णांवर उपचार : ‘नीमा’ने दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाईच नाहीनागपूर : बोगस डॉक्टरांकडून सर्रास रुग्णांवर उपचार होत आहे. उपचाराच्यादरम्यान अनेकांच्या जीवावर बेतत आहे. त्यानंतरही प्रशासनाकडून अशा बोगस डॉक्टरांच्या विरोधात कठोर कारवाई होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. वाडी परिसरात असाच एक बोगस डॉक्टर आहे, जो रुग्णाच्या जीवाशी खेळत आहे. विशेष म्हणजे, डॉक्टरासोबतच त्याचे रजिस्ट्रेशन क्रमांकही बोगस असल्याचे समोर आले आहे. संबंधित बोगस डॉक्टराच्या विरोधात नॅशनल इन्टीग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (नीमा) तक्रार दाखल केली आहे, परंतु अद्यापही कारवाई नाही. धर्मेश एच. खाडे असे त्या बोगस डॉक्टराचे नाव आहे. ‘श्री क्लिनिक’ असे नाव लिहिलेल्या प्रिस्क्रीप्शनवर तो रुग्णांना औषधे लिहून देतो. लोकमतला प्राप्त झालेल्या या प्रिस्क्रीप्शनवर त्याचा रजिस्ट्रेशन नंबरही बदलत असल्याचे दिसून आले. यावर मेडिकल अधिकारी, क्रिटी केअर हॉस्पिटल नागपूर व जी.टी. हॉस्पिटल नागपूर असेही लिहून आहे. यावर उपलब्ध सोयींमध्ये ‘ब्लड शुगर’, ‘नेब्युलायजेशन’, वात रोगावर उपचार, ‘मायनर सर्जिकल’ असा उल्लेखही करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा डॉक्टर अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. १७ आॅक्टोबर २०१२च्या प्रिस्क्रीप्शनवर संबंधित डॉक्टराची डिग्री बीएएमएस आणि रजिस्ट्रेशन क्रमांक ए-२५४१ दिले आहे. यात खाडे याने स्वत:ला फॅमिली डॉक्टर व बालरोग तज्ज्ञ लिहिलेले आहे. त्याच प्रकारे १० सप्टेंबर २०१३च्या प्रिस्क्रीप्शनवर त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक बदललेला आहे. यात ५२३९३/ए असे लिहिलेले आहे. १५ जून २०१५च्या औषधाच्या चिठ्ठीवर खाडे याचा रजिस्ट्रेशनच क्रमांक लिहिलेला नाही. यात त्याने स्वत:ला केवळ फॅमिली डॉक्टर लिहिले आहे. नियमानुसार कोणत्याही पॅथीच्या डॉक्टराला रजिस्ट्रेशन क्रमांक एकच दिला जातो. ‘नीमा’ने जेव्हा संबंधित डॉक्टराच्या रजिस्ट्रेशन क्रमांकाची माहिती घेतली असता हा क्रमांक रजिस्टरच झाला नसल्याचे पुढे आले. या संदर्भात ‘नीमा’ने वर्षभरापूर्वीच पोलीस, जिल्हा आरोग्य अधिकारी, अन्न व पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या दरम्यान हा बोगस डॉक्टर काही वेळेसाठी भूमिगतही झाला होता. परंतु आता तो पुन्हा गरीब रुग्णांवर उपचार करीत आहे. (प्रतिनिधी)
डॉक्टर एक, रजिस्ट्रेशन अनेक
By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST