डॉक्टरांनी मानवतेला विसरूनये
By Admin | Updated: July 2, 2015 03:17 IST2015-07-02T03:17:54+5:302015-07-02T03:17:54+5:30
पूर्वी आधुनिक उपकरणे, वैद्यकीय सुविधा नव्हत्या. तरीसुद्धा डॉक्टर-रुग्णांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध राहत होते.

डॉक्टरांनी मानवतेला विसरूनये
मिलिंद माने यांचे प्रतिपादन : ‘आयएमए’च्या वरिष्ठ डॉक्टरांचा सत्कार
नागपूर : पूर्वी आधुनिक उपकरणे, वैद्यकीय सुविधा नव्हत्या. तरीसुद्धा डॉक्टर-रुग्णांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध राहत होते. या संबंधामुळे आणि योग्य उपचारामुळे आजार ठीक होत होते. आधुनिक काळात युवा डॉक्टरांजवळ अत्याधुनिक उपकरणे, सुविधा आहेत. परंतु त्यांच्यात मानवता पाहावयास मिळत नाही, असे प्रतिपादन आमदार तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद माने यांनी व्यक्त केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये डॉक्टर्स डे निमित्त आयोजित समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र मेडिकल कौंसिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी, आयएमएचे नागपूर अध्यक्ष डॉ. अजय काटे, सचिव डॉ. सरिता उगेमुगे उपस्थित होत्या. कार्यक्रमात सामाजिक, आरोग्य आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तीत डॉ. प्रभा भट्टाचार्य, डॉ. व्ही. के. देशपांडे, डॉ. संजय जायस्वाल, डॉ. सुनंदा लेले, डॉ. विजय तुंगार, डॉ. कुमुद ठक्कर, डॉ. मल्हार कवळे, डॉ. सुनील गुप्ता, डॉ. आशुतोष आपटे, डॉ. प्रदीप मिश्रा, डॉ. दिवाकर भोयर यांचा समावेश होता. डॉ. माने म्हणाले, ज्येष्ठ डॉक्टरांच्या संघर्षापासून तरुण डॉक्टरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. भावनात्मक रूपाने रुग्णांशी मिसळून विचार केल्यास डॉक्टर आणि रुग्णांमधील आत्मियता वाढीस लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. किशोर टावरी म्हणाले, संवादाच्या अभावामुळे डॉक्टर आणि रुग्णांमधील संबंधात कटुता येत आहे. शासकीय क्षेत्रातील वैद्यकीय सुविधेत बदल घडवून आणण्याची गरज आहे. अर्थसंकल्पात आरोग्यावर दोन टक्क्यांपेक्षा कमी रक्कम खर्च होत असून खासगी क्षेत्रातील रुग्णालयांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. डॉ. अजय काटे यांनी आयएमएच्याउपक्रमांवर प्रकाश टाकला. संचालन डॉ. मीना मिश्रा, डॉ. अल्का मुखर्जी यांनी केले. आभार डॉ. सरिता उगेमुगे यांनी मानले.(प्रतिनिधी)
रुग्णालयांच्या प्रकरणांचा निपटारा लवकरच
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आयएमएला रुग्णालयांच्या संबंधीत प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा त्वरीत करण्याचे आश्वासन आयएमएच्या सदस्यांना दिले. नागपुरात मिहान साकारत असताना विदेशी पर्यटक येणार आहेत. मेडिकल हबच्या रुपाने शहराचा विकास झाला आहे. त्यामुळे विदेशी पर्यटकही येथे आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येतील. त्यामुळे डॉक्टरांनी आपल्या व्यवसायाला एका वेगळ््या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.