‘गोल्डन अवर’मध्ये डॉक्टर गप्पांत

By Admin | Updated: July 6, 2014 00:57 IST2014-07-06T00:57:39+5:302014-07-06T00:57:39+5:30

रस्ता अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय सुविधा मिळाल्यास त्यांचा जीव वाचविता येतो. परंतु मेडिकलच्या डॉक्टरांना याचा विसर पडल्याचे दिसून येते. शनिवारी पहाटे एका भीषण

Doctor chappat in 'Golden Understanding' | ‘गोल्डन अवर’मध्ये डॉक्टर गप्पांत

‘गोल्डन अवर’मध्ये डॉक्टर गप्पांत

मेडिकलचा हलगर्जीपणा : दोन युवकांचा मृत्यू
नागपूर : रस्ता अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय सुविधा मिळाल्यास त्यांचा जीव वाचविता येतो. परंतु मेडिकलच्या डॉक्टरांना याचा विसर पडल्याचे दिसून येते. शनिवारी पहाटे एका भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तीन युवकांना मेडिकलच्या अपघात विभागात आणले. मात्र, त्यांना तत्काळ उपचार मिळालेच नाहीत. रुग्ण वाचविण्यासाठी आवश्यक पावलेही उचलण्यात आली नाही. मोडकळीस आलेल्या स्ट्रेचरवर दोन युवक शेवटचा श्वास घेत होते. त्याचवेळी काही डॉक्टर गप्पागोष्टींमध्ये तर एक जण झोप काढण्यात आणि मोबाईलवर गेम्स खेळण्यात मग्न होता. दोघांचा जीव गेल्यावर आणि नातेवाईकांचा आक्रोश वाढल्यावरच त्यांच्या धावपळी वाढल्या. मृताच्या केसपेपरवर आवश्यक नोंदी टाकून स्वत:ला वाचविण्याची ही धावपळ होती.
चेतन नीळकंठ निनावे (२५) व प्रवीण कुंभारे (२५) दोघेही रा. भिवापूर अशी मृतांची नावे असून, योगेश नीळकंठ निनावे (३०, रा. भिवापूर) जखमी तरुणाचे नाव आहे.
प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नातेवाईकांनी सांगितलेली ही घटना थरकाप उडविणारी आहे. यातील काहींनी हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ‘लोकमत’ला उपलब्धही करून दिले आहे. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश याचा अ‍ॅम्बुलन्सचा व्यवसाय आहे. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे असहकार आंदोलन सुरू असल्याने भिवापूर ग्रामीण रुग्णालयातून एका रुग्णाला योगेशने आपल्या अ‍ॅम्बुलन्समधून मेडिकलमध्ये आणले. परतीत एकटे यावे लागेल म्हणून चालक योगेशने लहान भाऊ चेतन व मित्र प्रवीण यालासुद्धा सोबतीला घेतले. रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करून परतीच्या मार्गावर असताना शनिवारी पहाटे ३.३० वाजता अपघात झाला. यात चेतन, प्रवीण व योगेश हे तिघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना नागपूर मेडिकल कॉलेजात हलविले. मात्र अपघात विभागातील डॉक्टरांनी आवश्यक ते उपचार केलेच नाही. वेळ जात होता, परंतु डॉक्टर गंभीर होत नसल्याचे पाहत नातेवाईकांनी आरडाओरड केली. त्यावेळी ६ वाजले होते. एका डॉक्टराने चेतनला तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
दुसऱ्या जखमीवर उपचार करण्यास नातेवाईकांनी जोर दिल्यावर ‘आम्हाला समजते, काय करायचे ते करू’ या भाषेत नातेवाईकाला खडसावले. जखमींच्या ओळखीचा एक खासगी डॉक्टर त्यावेळी उपस्थित होता. त्याने जखमीला व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे सांगितले. परंतु डॉक्टर त्याच्यावरच भडकले. मेडिकलमध्ये व्हेंिटलेटर नाही, जे आहेत ते नादुरुस्त असल्याचे सांगून त्यांना बाहेर काढले. त्याच्या काही वेळानंतर प्रवीण दगावल्याची माहिती आली. सर्वच डॉक्टरांनी मिळून या दोन्ही रुग्णांवर शर्थीचे प्रयत्न केले असते तर ते वाचू शकले असते, असेही नातेवाईकांचे म्हणणे आहे. परंतु डॉक्टर आवश्यक त्या उपाययोजना सोडून गप्पागोष्टींमध्ये तर एक जण झोपण्यात नंतर मोबाईलमध्ये गेम खेळण्यात व्यस्त होते.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत चेतनचा भाऊ प्रवीण निनावे व त्याच्या कुटुंबाने केली आहे. या संदर्भातील एक पत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही ते देणार आहेत.
एक डॉक्टर मोबाईलवर तर इतर गप्पागोष्टींमध्ये
जखमींना वाचविण्याचा ‘गोल्डन अवर’ सोडून एक डॉक्टर झोपेत होता नंतर तो उठून मोबाईलवर गेम खेळत होता, तर इतर डॉक्टर गप्पागोष्टींमध्ये रंगले होते. यातील एक सर्जरीचा डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना व्हेंटिलेटर नाही, हे समजविण्याचा प्रयत्न करीत होता.
अपघात विभागात बंद व्हेंटिलेटर
मेडिकलच्या अपघात विभागात विविध प्रकारे गंभीर स्वरूपातील रुग्ण येतात. असे असताना येथील व्हेंटिलेटर बंद कसे राहू शकते, असा प्रश्न विचारल्या जात आहे. मेडिकल प्रशासन रुग्णांच्याप्रति किती गंभीर आहे, हे यावरून दिसून येते.

Web Title: Doctor chappat in 'Golden Understanding'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.