मनोरुग्णांकडे दुर्लक्ष का ?
By Admin | Updated: June 24, 2014 01:02 IST2014-06-24T01:02:10+5:302014-06-24T01:02:10+5:30
प्रादेशिक मनोरुग्णालयात जून महिन्यात पहिल्या आठवड्यात लागोपाठ चार रुग्णांचा जीव गेला. यातील दोन रुग्ण वॉर्डातच मृतावस्थेत आढळून आले. आता पाच रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत.

मनोरुग्णांकडे दुर्लक्ष का ?
पाच रुग्ण मेडिकलमध्ये : अटेंडन्ट, डॉक्टरांची पदे रिक्त
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात जून महिन्यात पहिल्या आठवड्यात लागोपाठ चार रुग्णांचा जीव गेला. यातील दोन रुग्ण वॉर्डातच मृतावस्थेत आढळून आले. आता पाच रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. यातील दोन रुग्ण गंभीर आहेत. रुग्ण गंभीर होईपर्यंत त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचा धक्कादायक हा प्रकार समोर आला आहे.
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम मनावरही होऊ लागला आहे. मनोविकाराच्या रुग्णांत वाढ होऊ लागल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात २०१० मध्ये ४१ हजार ८२८ रुग्णांची नोंद झाली होती, २०१३ मध्ये यात ११ हजार १७८ रुग्णांची वाढ होऊन रुग्ण संख्या ५३ हजार ६ वर गेली आहे. यात पुरुषांची संख्या अधिक असून स्क्रि झोफेनिया (नैराश्य) आणि डिप्रेशनच्या (खिन्नता) रु ग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या मनोरुग्णालयात ५०० च्यावर स्त्री व पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शी मानसिक संघर्ष सुरू आहे. या संघर्षात मनोविकारतज्ज्ञांची साथ मोलाची. मात्र, डॉक्टरांपासून ते अटेंडन्ट यांची संख्या तोकडी असल्याने रुग्णांकडे विशेष लक्ष दिले जात नाही. रुग्णालयात वर्ग ‘अ’मधील नऊ मनोविकारतज्ज्ञांची पदे मंजूर आहेत, परंतु प्रत्यक्षात वर्ग ‘अ’मधील एक आणि उर्वरित चार मनोविकारतज्ज्ञ हे वर्ग ‘ब’मधील आहेत. विशेष म्हणजे, ‘अ’ वर्गातील डॉक्टर हे वैद्यक औषधशास्त्राचे तज्ज्ञ आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून त्यांनी रुग्णांना तपासणेच बंद केल्याची माहिती आहे. मनोरुग्णांची देखरेख व देखभाल करण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य अटेंडन्टचे आहे. परंतु त्यांची संख्याही फार कमी आहे. मनोरुग्णालयात १८२ पुरुष अटेंडन्टची पदे मंजूर असताना मागील पाच वर्षांपासून ४० पदे रिक्त आहेत. (प्रतिनिधी)
प्रत्यक्ष रुग्णसेवेत फक्त ५८ अटेंडन्ट
४\मनोरुग्णालयात सध्याच्या स्थितीत १४० अटेंडन्ट आहेत. यातील कार्यालयीन कामामध्ये ६, बाह्यरुग्ण विभागात ११, लिपिकाच्या कामासाठी ४, गार्डरुममध्ये ९, डेप्युटेशन्सवर ८, स्वयंपाक खोलीत १५, आॅक्युपेशन थेरपीमध्ये ६, उद्यानात ६ तर ५ जण निलंबित आहेत. यातच आठ अटेंडन्ट मागील वर्षापासून गैरहजर आहेत. दोन अटेंडन्ट रोज रजेवर असतात तर दोन फार्मासिस्ट असताना औषधांचे वितरण करतात. असे एकूण तब्बल ८२ अटेंडन्ट रुग्णसेवेच्या बाहेर आहेत. फक्त ५८ अटेंडन्ट रुग्णसेवेत आहेत. यातही दर वर्षी तीन अटेंडन्ट सेवानिवृत्त होत आहेत. अशीच स्थिती महिला अटेंडन्टची आहे. विशेष म्हणजे, गरज नसताना विविध अटेंडन्टकडे विविध विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात वैद्यकीय अधीक्षकाचे नियोजन नसल्याचे दिसून येते. परिणामी रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. सध्या बिन्नासह आणखी तीन महिला तर दोन पुरुष मनोरुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. यातील एक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.