विद्यार्थ्यांपेक्षा कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात का?

By Admin | Updated: January 24, 2015 02:16 IST2015-01-24T02:16:38+5:302015-01-24T02:16:38+5:30

बीएसस्सी अभ्यासक्रमातील नापास विद्यार्थ्यांच्या मुद्यावर ‘अभाविप’ने (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) शुक्रवारी विद्यापीठात जोरदार आंदोलन केले.

Do programs seem more important than students? | विद्यार्थ्यांपेक्षा कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात का?

विद्यार्थ्यांपेक्षा कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात का?

नागपूर : बीएसस्सी अभ्यासक्रमातील नापास विद्यार्थ्यांच्या मुद्यावर ‘अभाविप’ने (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) शुक्रवारी विद्यापीठात जोरदार आंदोलन केले. प्रभारी कुलगुरूंनी याअगोदर आश्वासन देऊनदेखील पावले उचलली नाही आणि आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी त्यांना कार्यक्रम जास्त महत्त्वाचे वाटतात, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
५ हजार विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी अभाविपने केली. सत्र २०१२ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम वर्षाला शिकत असलेले विद्यार्थी काही विषयात अनुत्तीर्ण राहिले. नागपूर विद्यापीठाने पारित केलेल्या अध्यादेशानुसार तीन प्रयत्नांमध्ये सदर प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या सत्र पद्धतीमध्ये सामावून घेण्यात येते. तसेच, सदर विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रम पद्धतीमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घ्यावा लागतो. सदर ठराव विद्यापीठाने महाविद्यालयांचे हितसंबंध लक्षात घेऊन केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अजून एक संधी देण्यात यावी, अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली. प्रभारी कुलगुरू पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार कार्यक्रमाला गेले होते. त्यांची भेट न झाल्याने कार्यकर्ते आणखी संतप्त झाले. अखेर प्र-कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर व कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांनी विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतली. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. आंदोलनात अभाविपचे महानगर मंत्री गौरव हरडे, सहमंत्री रजतराज बघेल,जिल्हा संयोजक अमेय विश्वरुप, प्रसिद्धीप्रमुख अभिजित वडनेरे हे प्रामुख्याने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Do programs seem more important than students?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.