महापुरुषांच्या पुतळ्यांना जातींमध्ये वाटू नका
By Admin | Updated: March 26, 2015 02:35 IST2015-03-26T02:35:23+5:302015-03-26T02:35:23+5:30
महापुरुष कोणताही एक समाज, जात किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. यामुळे स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांच्या पुतळ्यांना जातीधर्मानुसार वाटून घेऊ नका,...

महापुरुषांच्या पुतळ्यांना जातींमध्ये वाटू नका
नागपूर : महापुरुष कोणताही एक समाज, जात किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. यामुळे स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांच्या पुतळ्यांना जातीधर्मानुसार वाटून घेऊ नका, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले.
अमरावती मार्गावरील सर्वोदय आश्रम येथे बुधवारी आचार्य विनोबा भावे यांच्या अर्धपुतळ्याचे धर्माधिकारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. जमनालाल बजाज पुरस्काराचे मानकरी जयवंत मठकर, ज्येष्ठ पत्रकार दि.भा. उपाख्य मामा घुमरे व डॉ. विभावरी लेले हे प्रमुख अतिथी होते.
धर्माधिकारी यांनी देशातील वर्तमान परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. सोशल मीडियामुळे नात्यातील गोडवा हरवला आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून इंटरनेटवर चॅटिंग करतात; पण आमोरासामोर असल्यावर त्यांना शब्दही फुटत नाही. घरातील घरपणच हरवले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आचार्य विनोबा भावे हे श्रम व सेवेला ब्रह्मविद्येशी जोडणारे एकमेव व्यक्ती आहेत. शब्दांचा जिवंतपणा ओळखण्यासाठी विनोबा वाचले पाहिजे. त्यांनी दुर्जनांची शक्ती कमी करून सज्जनांची चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.
मठकर यांनी विनोबा भावे यांच्यासंदर्भातील जुन्या आठवणी सांगून लोकांनी एकत्र येऊन हृदय जोडण्याचे काम केले पाहिजे, असे नमूद केले.
विनोबा भावे यांच्याजवळ दैवी संपत्ती होती. ते स्वत:ही आपण या जगातले नाही असे मानत. त्यांचे चरित्र वाचावे तेवढे कमी आहे, असे घुमरे यांनी सांगितले.
विनोबा भावे सर्वांचे असले तरी त्यांच्यावर विदर्भाचा जास्त अधिकार असल्याचे मत डॉ. लेले यांनी व्यक्त केले. प्रा. विशाखा बागडे यांनी संचालन तर डॉ. दमयंती पांढरीपांडे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)