म्हणू नका आसवांत, स्वप्न माझे वाहून गेले!

By Admin | Updated: June 19, 2014 01:02 IST2014-06-19T01:02:16+5:302014-06-19T01:02:16+5:30

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू होता. शासनाची कामेही मोठ्या प्रमाणात होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाण्याच्या पंपाचे काम सुरू असताना अचानक वरून मशीन पडली.

Do not say, in the air, the dream vanished me! | म्हणू नका आसवांत, स्वप्न माझे वाहून गेले!

म्हणू नका आसवांत, स्वप्न माझे वाहून गेले!

विपरीत स्थितीत मुलगा प्रतीक रिंढेने मिळविले यश
नागपूर : इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू होता. शासनाची कामेही मोठ्या प्रमाणात होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाण्याच्या पंपाचे काम सुरू असताना अचानक वरून मशीन पडली. पाय चिरत खाली आपटली. ती मशीन ३५० किलो वजनाची होती. फ्रॅक्चर झाले नाही पण पायाचे मांस गुडघ्यापासून कापले गेले. त्वरित मेडिकलमध्ये उपचारही झाले अन् टाके टाकण्यात आले. दुसऱ्या दिवशी मात्र पायात वेदनांनी काहूर मांडले, सारे अंगच वेदनांनी ठणकले. खाजगी रुग्णालयात गेल्यावर पायात गँगरीन होऊन ते शरीरात पसरत असल्याचे निष्पन्न झाले. जीव वाचवा किंवा पाय, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. जीव वाचविण्यासाठी पाय कापावा लागला. पण या परिस्थितीतही मुलगा प्रतीकने मात्र ९७.६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. त्याचे समाधान वाटते, असे अनिल रिंढे यांनी भावपूर्णतेने सांगितले.
म्हणू नका आसवांत...स्वप्न माझे वाहून गेले। उदास पाण्यात सोडलेले ते दीपदान होते।। अशा भटांच्या ओळी आहे. त्याप्रमाणेच आयुष्यभराची एक वेदना मिळाल्यावर मुलाच्या यशाने अनिल आपले दु:ख विसरून गेले. प्रतीक अनिल रिंढे यांने दहावीच्या परीक्षेत हे यश मिळविले. प्रतीक म्हणाला, माझे प्रॅक्टीकल आणि परीक्षेच्या दिवसातच बाबांचा अपघात झाला. बाबा त्या काळात रुग्णालयात भरती होते पण मला घरच्यांनी त्यांना भेटूच दिले नाही. तू अभ्यासाकडेच लक्ष दे, असे सांगण्यात आले. त्यामुळे मी अभ्यासावरच लक्ष केंद्रित केले होते. काळजी करण्यासारखे नाही, बाबा लवकर घरी येतील, असेही आई म्हणाली. त्यामुळे काय झाले त्याची कल्पना मला आली नाही. बाबांशी फोनवर बोलणे व्हायचे, तेवढेच. बाबांना सुटी झाल्यावर ते घरी आले. पण तब्बल तीन दिवस मला कुणीच काही कळू दिले नाही. त्यानंतर रात्री अभ्यास झाल्यावर रात्री २ वाजता मला बाबांनी बोलाविले.
माझ्या परीक्षेच्या दरम्यान मला बाबांचा पाय कापला गेला, हे कळले तर परीक्षेत व्यत्यय येऊ शकतो, याची जाण ठेवून मला बाबांनी रात्री २ वाजता अपघातात पाय कापावा लागल्याचे सांगितले अन् माझ्या पायाखालची वाळू सरकली. हा माझ्यासाठी अनपेक्षित दु:खद धक्का होता. बाबांनी मला जवळ घेतले आणि दोघांचेही डोळे अश्रूंनी डबडबले. मी प्रचंड अस्वस्थ झालो. काय करावे तेच कळले नाही. पण बाबांनीच मला छातीशी कवटाळून धीर दिला. अभ्यासात लक्ष दे आणि माझा विचारही करू नको, असे सांगितले. हे फार कठीण होते पण परीक्षा तोंडावर होती. या भावनिक, मानसिक अवस्थेत अभ्यासात मनच लागत नव्हते पण अभ्यास केला. माझे यश पाहिल्यावर बाबांना समाधान वाटते, याचा मला आनंद आहे. प्रतीक पं. बच्छराज व्यास विद्यालयाचा विद्यार्थी आहे. यानंतर मला स्पेस सायन्समध्ये अभियंता व्हायचे आहे, असेही प्रतीकने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Do not say, in the air, the dream vanished me!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.