ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका
By Admin | Updated: October 10, 2016 02:15 IST2016-10-10T02:15:50+5:302016-10-10T02:15:50+5:30
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले असताना आता विदर्भातील ओबीसी नेतेदेखील पुढे

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले असताना आता विदर्भातील ओबीसी नेतेदेखील पुढे सरसावले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा विरोध नाही, परंतु हे आरक्षण देत असताना ओबीसींच्या हक्काला धक्का लावू नका, या मागणीसाठी विदर्भातील सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांना सकारात्मक आश्वासन दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. मराठा आरक्षण दिले तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोहोचण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी तसेच राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा व विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दुपारी ३ वाजता रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेतली.
विशेष ओबीसी मंत्रालयाचे आश्वासन
या बैठकीदरम्यान राज्यात विशेष ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. ओबीसींच्या हक्कांचे जतन झाले पाहिजे व त्यासाठी हे मंत्रालय आवश्यक आहे. याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.