सरकारी देणे भरू नका : शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल : तुरुंगात टाकाल तर उखडून फेकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 20:54 IST2017-12-12T20:41:21+5:302017-12-12T20:54:04+5:30
बळीराजा संकटात असताना सरकारने कर्जमाफीची रक्कम दिली नाही. शेतमलाला किंमत दिली नाही. कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे आता सरकारचे कुठलेही देणे भरणार नाही, विजेचे बिलही भरणार नाही, असा निर्णय घ्या. या मोर्चातून गेल्यावर घरोघरी जाऊन सरकारला यापुढे साथ देणार नाही हे सांगा, असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

सरकारी देणे भरू नका : शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल : तुरुंगात टाकाल तर उखडून फेकू
आॅनलाईन लोकमत
नागपूर : बळीराजा संकटात असताना सरकारने कर्जमाफीची रक्कम दिली नाही. शेतमलाला किंमत दिली नाही. कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे आता सरकारचे कुठलेही देणे भरणार नाही, विजेचे बिलही भरणार नाही, असा निर्णय घ्या. या मोर्चातून गेल्यावर घरोघरी जाऊन सरकारला यापुढे साथ देणार नाही हे सांगा, असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. एवढेच नव्हे तर दमदाटी करून, तुरुंगात टाकून सामान्य माणसाचा आवाज दाबाल तर तुम्हाला उखडून फेकण्याची ताकद बळीराजात आहे, असा गर्भित इशाराही त्यांनी सरकारला दिला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी राज्य सरकारच्या विरोधात जनमानसात असलेली खदखद मांडण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर ‘जनआक्रोश- हल्लाबोल’ मोर्चा काढला. मोर्चासाठी दोन्ही पक्षाचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते नागपूरच्या रस्त्यावर उतरले. दोन्ही पक्षांच्या मोर्चाचे रूपांतर झिरो माईल टी-पॉर्इंट येथे जाहीर सभेत झाले. यावेळी मंचावर काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अ.भा.काँग्रेस समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, काँग्रेस नेते माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, खा. सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पतंगराव कदम आदी उपस्थित होते.
मोर्चाला जमलेली हजारोंची गर्दी पाहून शरद पवार म्हणाले, झोपलेल्या सरकारवर हल्लाबोल करून जागे करायचे आहे आणि संधी मिळेल तेव्हा सरकार उलथून फेकायचे आहे. परिवर्तन होईपर्यंत हल्लाबोल थांबवायचा नाही, असे सांगण्यासही ते विसरले नाही.
पवारांनी काढली शरम देशाच्या नेतृत्वाकडून देशाला वेगळ्या दिशेने नेण्याची पावले टाकली जात आहेत. मणिशंकर अय्यर यांच्याघरी झालेल्या बैठकीत पाकच्या मदतीने गुजरातमध्ये भाजपाचा पराभव करण्यावर चर्चा झाली, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. मनमोहनसिंग यांच्यासारख्या चारित्र्यसंपन्न व देशप्रेमीवर शंका घेतली. अशी भूमिका कुणी मांडली तर शरम वाटली पाहिजे. हे देशाच्या हिताचे नाही, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली. महाराष्ट्र कोणत्याही परकीय ताकदीला पाऊल टाकू देत नाही. ही परंपरा पंतप्रधानांनी उद्ध्वस्त केली, ही दु:खाची बाब आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी व संबंधितांचा संताप टाळण्यासाठी पाकिस्तानचा उल्लेख करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.