जखमींकडे दुर्लक्ष करू नका, मदत करा
By Admin | Updated: February 2, 2015 01:07 IST2015-02-02T01:07:09+5:302015-02-02T01:07:09+5:30
अपघात झाल्यावर बघ्याची भूमिका न घेता कर्तव्य म्हणून त्यांना मदत करण्यासाठी पुढे या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना केले.

जखमींकडे दुर्लक्ष करू नका, मदत करा
मुख्यमंत्री: रस्ता सुरक्षा अभियान पुरस्कार वितरण
नागपूर : अपघात झाल्यावर बघ्याची भूमिका न घेता कर्तव्य म्हणून त्यांना मदत करण्यासाठी पुढे या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना केले.
राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित आंतर विद्यापीठ रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने, पोलीस आयुक्त के.के. पाठक, वाहतूक शाखेचे अतिरिक्त महासंचालक सुरेद्र पांडे उपस्थित होते.
अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र असे न करता जखमींना तत्काळ कशी मदत मिळेल यासाठी युवकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी विद्यापीठस्तरावर प्रथम आलेल्या भारती विद्यापीठाला ५ लाख व फिरते चषक, व्दितीय पुरस्कार प्राप्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व तृतीय पुरस्कार प्राप्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडला ७५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विशेष पुरस्कार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालाही यावेळी विशेष पुरस्कार देण्यात आले. (प्रतिनिधी)
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी २३ महामार्गावर पोलीस केंद्र
देशात सर्वाधिक अपघात महाराष्ट्रात होत असून १८ ते ३० वयोगटातील वाहन चालकांमध्ये अपघाताचे प्रमाण राज्यात अधिक आहे. अपघात झाल्यावर मदतीसाठी राज्यातील २३ महामार्गावर ६३ महामार्ग पोलीस केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) सुरेंद्र पांडे यांनी सांगितले.