‘सोनोग्राफी’साठी डॉक्टरच मिळेना
By Admin | Updated: May 6, 2015 02:09 IST2015-05-06T02:09:33+5:302015-05-06T02:09:33+5:30
सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात ‘अल्ट्रा सोनोग्राफी’चे मशीन आहे, परंतु ते चालविण्यासाठी रेडिओलॉजिस्टच नाही.

‘सोनोग्राफी’साठी डॉक्टरच मिळेना
नागपूर : सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात ‘अल्ट्रा सोनोग्राफी’चे मशीन आहे, परंतु ते चालविण्यासाठी रेडिओलॉजिस्टच नाही. ५०० रुपयाच्या मानधनावर काम करायला कुणी तयार नाहीत. परिणामी, रुग्णांना पदरमोड करून बाहेरून सोनोग्राफी करावी लागत आहे. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून शासनाला रेडिओलॉजिस्टसह पॅथालॉजिस्ट व भूलतज्ज्ञाच्या पद भरतीची मागणी करीत आहे, परंतु शासन प्रस्ताव पाठवा म्हणण्यापलिकडे उपाययोजना करीत नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
चांगले आरोग्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु शासनाच्या उदासीनतेचा फटका आयुर्वेद रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना बसत आहे. दर तीन वर्षानंतर शासनाने आढावा बैठक घेऊन रुग्णालयातील आवश्यक पदांना मंजुरी देण्याचा नियम असताना गेल्या आठ वर्षांपासून बैठकच झालेली नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, २००७ मध्ये तब्बल २५ वर्षानंतर आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंजूर झालेला पदांवरच रुग्णालयाचा कारभार आजही सुरू आहे. गेल्या आठ वर्षांपासून रुग्णालय प्रशासन बैठकीच्या प्रतीक्षेत आहे, परंतु शासन याला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे.
रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट हे पद नाही. परंतु ‘अल्ट्रा सोनोग्राफी’ यंत्र आहे. हे चालविण्यासाठी रेडिओलॉजिस्ट असावा, असा शासनाचा नियम आहे. गेल्या काही महिन्यांपासून एक रेडिओलॉजिस्ट सेवाभाव म्हणून ५०० रुपये मानधनावर यायचा. परंतु एवढ्या कमी मानधनावर त्यांचा येण्या-जाण्याचा खर्चही निघत नसल्याने येणे बंद केले.
यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून यंत्र बंद आहे. या मानधनावर दुसरे रेडिओलॉजिस्ट यायला तयार नाहीत. यातच ‘अल्ट्रा सोनोग्राफी’ मशीन सहा महिन्यांपूर्वीच ‘आऊटडेटेड’ झाल्याची माहिती आहे. परिणामी, रुग्ण अडचणीत आले आहेत.(प्रतिनिधी)