आमदार सरनाईक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:56+5:302021-03-04T04:12:56+5:30
नागपूर : निवडणूक आचारसंहिता उल्लंघन प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अमरावतीचे शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक ...

आमदार सरनाईक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करू नका
नागपूर : निवडणूक आचारसंहिता उल्लंघन प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अमरावतीचे शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक यांच्याविरुद्ध पुढील आदेशापर्यंत न्यायालयात आरोपपत्र दाखल करू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. तसेच, सरनाईक यांच्याविरुद्ध अन्य सक्तीची कारवाई करण्यासही मनाई केली.
सरनाईक यांनी संबंधित गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने सरनाईक यांना सदर अंतरिम दिलासा दिला व राज्य सरकारला नोटीस बजावून अर्जावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले. सरनाईक यांच्याविरुद्ध राजेश नागलवार यांनी तक्रार दिली आहे. सरनाईक यांनी आचारसंहिता लागू असताना मतदारांना पैसे व साड्या वाटप केल्या असा त्यांचा आरोप आहे. या तक्रारीवरून २८ नोव्हेंबर २०२० रोजी सरनाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. सरनाईक यांच्यावतीने ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.