सन्मानाने जगण्याचाही हक्क नाही का?
By Admin | Updated: October 15, 2015 03:18 IST2015-10-15T03:18:13+5:302015-10-15T03:18:13+5:30
आयुष्यभर विद्यार्थ्यांना संस्कार दिल्यानंतर निवृत्तीनंतरचे आयुष्य शांततेत व्यतित करणे, वर्षानुवर्षे संघर्ष करून जमा केलेल्या पैशांमधून घराला आकार देणे अन् स्वत:च्या हक्काच्या ‘पेन्शन’मधून

सन्मानाने जगण्याचाही हक्क नाही का?
‘पेन्शन’साठी लढणाऱ्या शिक्षिकेचा आर्त सवाल :
पांडे भगिनींच्या छळामुळे मानसिक नैराश्य आल्याचा आरोप
योगेश पांडे नागपूर
आयुष्यभर विद्यार्थ्यांना संस्कार दिल्यानंतर निवृत्तीनंतरचे आयुष्य शांततेत व्यतित करणे, वर्षानुवर्षे संघर्ष करून जमा केलेल्या पैशांमधून घराला आकार देणे अन् स्वत:च्या हक्काच्या ‘पेन्शन’मधून समाजातील वंचितांना जमेल तेवढा मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करणे, एवढीच अपेक्षा होती. वाटले होते निवृत्त झाल्यावर जगण्यातला संघर्ष संपेल, पण वाट्याला आले ते केवळ नैराश्य अन् छळवणूक! स्वत:च्याच पैशांसाठी इतके झगडावे लागेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. हे शब्द आहेत स्वत:च्या ‘पेन्शन’साठी लढणाऱ्या सपना जयसिंघानी या निवृत्त शिक्षिकेचे. त्यांंच्या तक्रारीनंतर लाचलुचपत खात्याने शहराच्या माजी महापौर कल्पना पांडे व त्यांची बहीण भारती पांडे यांच्याविरुद्ध बुधवारी कारवाई करण्यात आली. या प्रकरणाबाबत ‘लोकमत’ने जयसिंघानी यांच्याशी संवाद साधला तेव्हा अक्षरश: अश्रू गाळत त्यांनी आपबिती सांगितली.
गांधीबाग येथील छन्नूलाल नवीन विद्याभवन हायस्कूल येथून सपना जयसिंघानी या ३१ जुलै रोजी निवृत्त झाल्या. भारती पांडे या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका असून कल्पना पांडे व्यवस्थापनावर आहेत. निवृत्त होण्याच्या तीन ते चार दिवस अगोदरपासूनच ५० हजार रुपये देण्यात यावे, असा दबाव दोघींनीही टाकण्यास सुरुवात केली. अगदी वर्ग सुरू असतानाही त्यात व्यत्यय आणण्यात आला.
निवृत्तीच्या दिवशीही यासंदर्भात विचारणा झाली व जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत ‘पेन्शन’च्या कागदपत्रांवर सही करणार नाही, अशी धमकी देण्यात आली. निवृत्तीवेतनासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया करण्यासही त्यांनी साफ नकार दिला व सातत्याने मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी शिवीगाळ करत कुटुंबीयांबद्दलदेखील अपशब्द काढण्यापर्यंत दोघींची मजल गेली. या धावपळीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम झाला व मानसिक नैराश्य आले, असा आरोप जयसिंघानी यांनी केला आहे. अखेर नातेवाईकांनी हिंमत दिल्यानंतर कल्पना व भारती पांडे यांच्याविरुद्ध तक्रार करण्याचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षक आमदारालाही जुमानले नाही?
शाळेच्या मुख्याध्यापिकेने निवृत्तीवेतनाच्या कागदपत्रांवर सही करावी म्हणून शिक्षक आमदार नागो गाणार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. गाणार यांनी भारती पांडे यांच्याशी संपर्क साधून प्रशासकीय कामात अडथळा आणू नका व त्यांचे काम करून द्या, असेदेखील सांगितले. परंतु त्यांच्या शब्दाचा मानही राखण्यात आला नाही, असा दावा जयसिंघानी यांनी केला. गाणार यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.
संघ परिवारातही खळबळ
कल्पना पांडे या भाजपा तसेच संघ परिवाराशी जुळलेल्या आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाच्या अधिवेशनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. शहराच्या माजी महापौर ही ओळख असलेल्या कल्पना पांडे यांचे मोठे पद मिळविण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे संघ परिवारातदेखील खळबळ माजली असून जर त्या दोषी असतील तर त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, असा संघवर्तुळात मतप्रवाह आहे.
अधिवेशनातील शब्द केवळ दिखावा?
रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात मागील आठवड्यात अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी कल्पना पांडे यांनीच संचालन केले होते. शिक्षकांवरच संस्कार करण्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी या अधिवेशनात व्यक्त केले होते. तर संघ परिवारातील सदस्यांसमोर त्यांनी शिक्षकांना न्याय मिळविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले होते. परंतु स्वत:च्याच शाळेतील शिक्षिकेची अशी पिळवणूक करण्याबाबत त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अधिवेशनातील त्यांचे शब्द केवळ दिखावाच होते का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.