डॉक्टरांना हृदय नसते का?

By Admin | Updated: April 5, 2017 02:18 IST2017-04-05T02:18:06+5:302017-04-05T02:18:06+5:30

डॉक्टर म्हणजे देव ही आपली सर्वमान्य मानसिकता. रुग्णाने देव पाहिला नसतो तो ज्याच्या हातात आपला जीव सोपवतो.....

Do not the doctor have heart? | डॉक्टरांना हृदय नसते का?

डॉक्टरांना हृदय नसते का?

किती हा निर्दयीपणा?: सुनील सय्यामच्या उपेक्षेनंतर समाजमन संतप्त
नागपूर : डॉक्टर म्हणजे देव ही आपली सर्वमान्य मानसिकता. रुग्णाने देव पाहिला नसतो तो ज्याच्या हातात आपला जीव सोपवतो तोच त्याच्यासाठी देव असतो. अशा या रुग्णांसाठी देव असलेल्या डॉक्टरांनी देवासारखेच सहृदयी वागणे अपेक्षित असते. परंतु केवळ घड्याळाचे काटे आणि महिन्याच्या पगारावर लक्ष ठेवून काम करणारे काही डॉक्टर या पवित्र पेशालाच कलंकित करीत आहेत. सुनील सय्यामची वेदनादायी कथा ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मेयोतील त्या डॉक्टरांच्या अमानवीय वागणुकीविरुद्ध संताप व्यक्त होत असून रुग्णाच्या जीवाशी खेळ मांडणाऱ्या या डॉक्टरांना हृदय नसते का, असा सवाल विचारला जात आहे.

शहरात येऊन मजुरी करून पोटाची भूक भागवू या विचाराने सुनील भीमराव सय्याम कुटुंबासह नागपुरात येत असतानाच अपघात झाला. रेल्वेतून खाली पडल्याने सुनीलचा डाव पाय गुडघ्यापासून कापला गेला. रेल्वे पोलिसांनी त्याला मेयोत दाखल केले. मेयोने जखमेवर त्वचा लावण्यासाठी मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरीच्या विभागात जाण्यास सांगितले. परंतु या विभागाने दोन दिवसानंतर येण्यास सांगितले. कुठे जावे, म्हणून सय्याम कुटुंबाने उघड्यावर दिवस काढले. दोन दिवसानंतर पुन्हा या विभागात गेल्यावर १५ दिवसांची तारीख दिली. जखम ओली असल्याने उपचारासाठी मेयोत आले, तर येथील एका डॉक्टरने हाकलून लावले. महिन्याभराच्या उपचारात या कुटुंबाचे पैसे संपले. जखमेवर बँडेज बांधण्यासाठीही पैसे नव्हते. शेवटी या कुटुंबावर भीक मागून उपचार करण्याची व पोटाची खळगी भरण्याची वेळ आली. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रसिद्ध करताच याला जबाबदार मेयो, मेडिकलचा गलथानपणाच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरी विभागात आवश्यक डॉक्टरांसह इतरही सोई आहेत. असे असताना, रुग्णांना उघड्या जखमा घेऊन शस्त्रक्रियेसाठी १५-१५ दिवसांची वाट पहावी लागते. येथील डॉक्टर केवळ हजेरी लावण्यासाठी विभागात येतात का, त्यांची खासगी ‘प्रॅक्टीस’ खपवून घेण्याचे कारण काय, अधिष्ठात्यांचे दुर्लक्ष का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. मेयोमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांना हाकलून लावणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. केवळ निवासी डॉक्टरांच्या भरवशावर हे रुग्णालय सुरू आहे. यातूनच पदोपदी गरीब रुग्णांना मिळणारी अपमानाची वागणूक व उपकाराच्या भावनेतून होत असलेल्या उपचारामुळेच सय्यामसारख्या अनेक कुटुंबावर उघड्यावर राहून वेळप्रसंगी भीक मागण्याची वेळ आल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)

 

Web Title: Do not the doctor have heart?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.