जातीयवाद्यांना थारा देऊ नका
By Admin | Updated: October 9, 2014 01:01 IST2014-10-09T01:01:13+5:302014-10-09T01:01:13+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विविध मार्गाने केलेल्या प्रचाराला मतदार बळी पडले. विधानसभा निवडणुकीत अशा प्रचाराच्या आहारी जाऊ नका तसेच जातीयवाद्यांना थारा देऊ नका,

जातीयवाद्यांना थारा देऊ नका
आर. आर. पाटील : वाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची सभा
वाडी : गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विविध मार्गाने केलेल्या प्रचाराला मतदार बळी पडले. विधानसभा निवडणुकीत अशा प्रचाराच्या आहारी जाऊ नका तसेच जातीयवाद्यांना थारा देऊ नका, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री आर. आर. पाटील यांनी केले.
हिंगणा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश बंग यांच्या प्रचारार्थ आर. आर. पाटील यांची वाडी येथे जाहीर सभा झाली. त्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्यावेळी काळा पैसा देशात आणण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. मात्र त्यांना अद्याप काळा पैसा अद्याप देशात आणता आला नाही. केंद्र सरकार देशाच्या सुरक्षेबाबत केवळ चर्चा करत असून गंभीर नाही. सभागृहाचे कामकाज बंद पाडणाऱ्यांना तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली, असा आरोप करून ही मंडळी भाजपमध्ये येताच पवित्र कसे होतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
सध्या महाराष्ट्रात ‘आयाराम - गयाराम’ची संस्कृती मूळ धरत आहे. काही पक्ष अशांना उमेदवारी देऊन मतदारांना बनविण्याचे काम करीत आहे. मतदारांनी या संस्कृतीच्या आहारी जाऊ नये. नागपूर जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आर. आर. पाटील यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर आ. प्रकाश गजभिये, रमेश बंग, उमेश पाटील, प्रगती पाटील, राजेश जयस्वाल, मोहन ठाकरे, कृष्णा तायडे, मोहन हिरणवार, गंगाप्रसाद ग्वालवंशी, प्रा. कोठे, प्रा. मोरे, वंदना पाल, उज्ज्वला बोढारे, राजाभाऊ ताकसांडे, अहमद शेख, अशोक माने, दत्ता वानखेडे, भीमराव लोखंडे, गणपत पाटील, नरेश बारई, दिनेश उईके, योगेश चरडे, अविनाश चौधरी, किताबसिंग चौधरी, नाना इखनकर, गणपत रागीट, सुनंदा ठाकरे, महेंद्र शर्मा, ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक श्याम मंडपे यांनी केले. संचालन प्रतिभा मोरे यांनी केले तर, संतोष नरवाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)