टाळेबंदी पूर्ण नको, निश्चित वेळेसाठी दुकाने सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:08 IST2021-04-06T04:08:50+5:302021-04-06T04:08:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र शासनाने वेगाने वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाला टोलविण्यासाठी राज्यात सोमवारी रात्री ८ वाजतापासून ते ...

टाळेबंदी पूर्ण नको, निश्चित वेळेसाठी दुकाने सुरू ठेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाने वेगाने वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाला टोलविण्यासाठी राज्यात सोमवारी रात्री ८ वाजतापासून ते ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली आहे. या निर्णयासंदर्भात व्यापारीवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. टाळेबंदी ही सप्ताहात आहे की पूर्ण महिनाभर, ही बाब व्यापाऱ्यांना समजलेली नाही. याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने राज्यातील जवळपास २५ लाख व्यापारी चिंतित आहेत.
यासंदर्भात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स(कॅट)ने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून स्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. सोबतच आर्थिक घडामोडींना पूर्णत: बाधित करण्यापेक्षा निश्चित वेळेचे निर्बंध लावून व्यापारीवर्गाला चिंतामुक्त करण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ट्रेड असोसिएशन्सला विश्वासात घेणेच योग्य असेल, अशी भावना कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केली आहे. टाळेबंदीमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे पूर्णत: टाळेबंदीऐवजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत बाजार सुरू ठेवून आणि व्यापारी संघटनांकडून सर्व स्तरावरील कोरोना सुरक्षा प्रोटोकॉल सुनिश्चित करण्यासाठी अधिक प्रयत्न केले जाऊ शकते. प्रत्येक बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमन बिंदू निश्चित केले जाऊन, व्यापारी संघांकडून अतिरिक्त काळजी घेणे व वाॅर्ड स्टाफची तैनाती करून नियोजन साधता येऊ शकते. व्यापारी समुदाय सरकारला सहयोग करण्यास तत्पर असून, या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकीचे आयोजन व्हावे, अशी मागणी भरतीया यांनी केली आहे.
..........