मराठा हॉटेल हत्याकांडात डीएनए जुळला
By Admin | Updated: July 2, 2014 00:54 IST2014-07-02T00:54:18+5:302014-07-02T00:54:18+5:30
हिंगणा एमआयडीसीस्थित ग्रेट मराठा हॉटेल येथील थरारक हत्याकांडात मृताचा व आरोपींच्या कपड्यावरील रक्ताचा डीएनए जुळला आहे. आरोपींना शिक्षा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा असल्यामुळे

मराठा हॉटेल हत्याकांडात डीएनए जुळला
हायकोर्ट : सत्र न्यायालयात अहवाल देण्याचे निर्देश
नागपूर : हिंगणा एमआयडीसीस्थित ग्रेट मराठा हॉटेल येथील थरारक हत्याकांडात मृताचा व आरोपींच्या कपड्यावरील रक्ताचा डीएनए जुळला आहे. आरोपींना शिक्षा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा असल्यामुळे डीएनए अहवाल सत्र न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तपास अधिकाऱ्याला दिले आहेत.
प्रकरणातील आरोपी आशिष वीरेंद्र नायडू, राहुल सुशील दुबे व कार्तिक शिवरामकृष्ण तेवर यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केले आहेत. अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांनी आज, मंगळवारी वरील निर्देश दिले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून, रक्त व इतर वस्तूंच्या नमुन्यांचा रासायनिक अहवाल अद्याप मिळाला नव्हता. अहवालामुळे पोलिसांची बाजू बळकट झाली आहे.
घटना २०१२ मधील असताना अद्याप रासायनिक अहवाल आला नसल्याची माहिती ऐकून न्यायालय संतापले होते. त्यांनी तपास अधिकाऱ्याला व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त एन. झेड. कुंभरे यांनी न्यायालयात हजेरी लावली.
कुंभरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेने गेल्या एप्रिलमध्ये अहवाल पाठविला होता, पण तो पोलीस ठाण्यात पोहोचला नाही. यामुळे कुंभरे यांनी स्वत: प्रयोगशाळेत जाऊन अहवाल आणला. न्यायालयाने आरोपींच्या वकिलांनाही अहवालाची एकेक प्रत देण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपींच्या अर्जावरील पुढील सुनावणी ८ जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.
मंजितसिंग ऊर्फ माँटी गुल्हर असे मृताचे नाव असून तो विठोबानगर, जरीपटका येथील रहिवासी होता. १३ मार्च २०१२ रोजी तो एका मुलीसोबत ग्रेट मराठा हॉटेलमध्ये गेला होता. तेथून सायंकाळी ७.२० च्या सुमारास बाहेर पडल्यानंतर बुरखा घातलेल्या चार आरोपींनी त्याच्यावर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्या.
मंजित हॉटेलच्या आत पळाल्यावर आरोपीही त्याच्या मागे गेले. हॉटेलमध्ये आरोपींनी पुन्हा दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी मंजितच्या पोटात शिरली तर, दुसरी दोन्ही डोळ्यांच्या मधात लागली. तो जागीच ठार झाला. यानंतर आरोपी पळून गेले. मंजितसोबतची मुलगीही नाहीशी झाली. आरोपी नंबर प्लेट नसलेल्या नॅनो कारमधून आले होते.(प्रतिनिधी)