दिवाळी एक्स्प्रेसला लागले ‘रिग्रेट’चे ग्रहण!
By Admin | Updated: August 22, 2016 02:36 IST2016-08-22T02:36:32+5:302016-08-22T02:36:32+5:30
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. अनेकजण या सणाला आपल्या घराकडे परततात.

दिवाळी एक्स्प्रेसला लागले ‘रिग्रेट’चे ग्रहण!
आरक्षण फुल्ल : प्रतीक्षा यादी ४०० वर, खिशाला पडणार ताण
दयानंद पाईकराव नागपूर
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. अनेकजण या सणाला आपल्या घराकडे परततात. यामुळे या दिवसात रेल्वेगाड्या फुल्ल होतात. परंतु दिवाळीला अजून दोन महिने एक आठवड्याचा कालावधी असताना आताच दिवाळीच्या काळातील सर्व रेल्वेगाड्यातील आरक्षण फुल्ल झाले आहे. सर्वच रेल्वेगाड्यांचा ताबा दलालांनी घेतल्यामुळे प्रतीक्षा यादी (वेटिंग) ४०० च्या आसपास पोहोचली आहे. तर काही गाड्यांचे तिकीटच मिळणे बंद झाले (रिग्रेट) आहे. यामुळे आता दिवाळीत प्रवाशांना दुप्पट ते तिप्पट तिकिटाचे शुल्क भरून महागड्या खासगी ट्रॅव्हल्स, विमानाने प्रवास करण्याची पाळी येणार आहे.
दिवाळीनिमित्त अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्याला प्राधान्य देतात. यामुळे या काळात खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडल्याची स्थिती असते. एरव्ही ७०० ते ९०० रुपयांना मिळणारे ट्रॅव्हल्सचे तिकीट दिवाळीच्या काळात तीन हजार रुपयांवर पोहोचते. प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि फायदेशीर माध्यम म्हणून असंख्य प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन दिवाळीतील सर्व आरक्षित तिकिटांवर दलालांनी ताबा मिळविल्याची स्थिती आहे. दिवाळीच्या काळात नागपुरातून मुंबई, पुणे, दिल्ली आणि बहुतांश शहरात जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचे ‘वेटिंग’ वाढले आहे. दिवाळीला दोन महिने एक आठवडा असताना आताच आरक्षणाची ही स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला ताण पडणार हे निश्चित झाले आहे.
मुंबई, दिल्ली मार्गही ‘फुल्ल’
नागपूर : नागपुरातून पुण्याला जाणाऱ्या १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये ३१ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ९८, थर्ड एसीत ६७ वेटिंग आहे. २ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ३२७ तर थर्ड एसीत १७८, ५ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ३७५, थर्ड एसीत २३१ एवढी प्रतीक्षा यादी आहे. १२१३० बिलासपूर-पुणे आझादहिंद एक्स्प्रेसमध्ये ३१ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ६१ वेटिंग, थर्ड एसीत ३४, १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये १४९ आणि थर्ड एसीत ५१, तर २ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये १८६ आणि थर्ड एसीत ५१ वेटिंग आहे. १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये १ नोव्हेंबरला तिकीट मिळणेच बंद झाले असून रिग्रेटची स्थिती आहे. ४ नोव्हेंबरला २३४ वेटिंग, ६ नोव्हेंबरला रिग्रेटची स्थिती आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यात १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये ३१ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ३८, थर्ड एसीत १८, १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ७४, थर्ड एसीत ५७, २ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ११४, थर्ड एसीत ४९ वेटिंग आहे. दुरांतो एक्स्प्रेसमध्येही ३१ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ५९, थर्ड एसीत १८, १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये १४६, थर्ड एसीत ६६ वेटिंग आहे. तर २ नोव्हेंबरला ‘रिग्रेट’ची स्थिती आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यात १६०३१ अंदमान एक्स्प्रेसमध्ये ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान ६७ वेटिंग आहे. १२७२१ निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये २८ आणि २९ आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. तर १२७२३ तेलंगाना एक्स्प्रेसमध्ये ३१ आॅक्टोबरला सर्वच कोचमध्ये रिग्रेटची स्थिती असून प्रवाशांना तिकीट मिळणेही बंद झाले आहे. याशिवाय इतर महत्त्वाच्या शहरात नागपुरातून जाणाऱ्या गाड्यांची हीच स्थिती असल्याचे आढळले. यामुळे प्रवाशांच्या खिशाला दिवाळीत ताण पडून त्यांना अधिकची रक्कम मोजून प्रवास करण्याची पाळी येणार आहे.(प्रतिनिधी)
स्पेशल ट्रेनची घोषणा आताच हवी
दिवाळीच्या काळातील सर्व रेल्वेगाड्यात वेटिंग आणि रिग्रेटची स्थिती निर्माण झाली आहे. दलालांनी आताच तिकिटे खरेदी करून ठेवल्यामुळे ही वेळ आली असून यात सर्वसामान्य प्रवाशांना नाहक मनस्ताप होणार आहे. रेल्वे प्रशासन दिवाळीच्या काळात ऐनवेळी स्पेशल ट्रेनची घोषणा करते. या स्पेशल ट्रेनबाबत बहुतांश प्रवाशांना माहितीच होत नसल्यामुळे त्या गाड्या रिकाम्या जातात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आताच स्पेशल ट्रेनची घोषणा करण्याची गरज आहे.’
प्रवीण डबली, माजी सदस्य, प्रादेशिक रेल्वे उपभोक्ता
सल्लागार समिती