दिव्यांग अशोकची ‘एव्हरेस्ट भरारी’

By Admin | Updated: May 22, 2016 02:40 IST2016-05-22T02:40:40+5:302016-05-22T02:40:40+5:30

नियतीच्या एका डावामुळे अपंगत्व आले. मात्र त्यातून स्वत:ला सावरत दृढनिश्चयच जणू अंगी बाळगला आणि पाहता-पाहता जिद्द, परिश्रम आणि तपश्चर्येच्या जोरावर

Divyang Ashoka's Everest Bharari | दिव्यांग अशोकची ‘एव्हरेस्ट भरारी’

दिव्यांग अशोकची ‘एव्हरेस्ट भरारी’

८५०० मीटरपर्यंतची मारली मजल : जिद्दीला मिळाली यशाची किनार
गणेश खवसे नागपूर
नियतीच्या एका डावामुळे अपंगत्व आले. मात्र त्यातून स्वत:ला सावरत दृढनिश्चयच जणू अंगी बाळगला आणि पाहता-पाहता जिद्द, परिश्रम आणि तपश्चर्येच्या जोरावर कठीण असे एव्हरेस्ट शिखर पार करण्याची लढाई लढण्यास सुरूवात केली. एव्हरेस्टचे ८५०० मीटरपर्यंतचे अंतर पार केले, मात्र अवघे ३४८ मीटर अंतर कापायचे असताना एका छोट्या अपघाताने पायाला इजा झाली. त्यामुळे ‘मिशन एव्हरेस्ट’ तेथेच सोडून परतीच्या प्रवासाला निघावे लागले. असे असले तरी त्याने एव्हरेस्ट सर करणाऱ्या आशियातील पहिल्या तरुणाचा ५७३२ मीटरचा विक्रम मागे टाकत स्वत:च्या नावावर एक विक्रम नोंदविला. अशोक रामलाल मुन्ने (३२) असे या ध्येयवेड्या आणि चिकाटी असलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा मूर्ती (ता. काटोल, जि. नागपूर) येथील रहिवासी आहे.
अशोक हा तसा जन्मत: सर्वसामान्यच. मात्र ३ फेब्रुवारी २००७ मध्ये रेल्वेने प्रवास करीत असताना तो खाली पडला. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने हॉस्पिटलध्ये भरती केले. तेथील डॉक्टरांनी त्याचा पाय कापण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पाय कापावा लागला. हॉस्पिटलमधून सुटी झाली आणि जणू पुनर्जन्म झालेलाच अशोक परतला. जिद्द, आत्मविश्वास अंगी बाळगलेल्या अशोकने आपणही इतरांसारखे सर्वसामान्य जीवन जगत सर्वांपेक्षा काही हटके करण्याचा दृढनिश्चय केला. त्याचवेळी म्हणजे २००९ मध्ये कृष्णा पाटीलने एव्हरेस्ट शिखर सर केले. ही बातमी त्याच्या कानावर पडताच त्यानेही ‘एव्हरेस्ट’ सर करण्याचा ‘इरादा पक्का’ केला.
अपंग असल्याने बऱ्याच अडचणी येणार याची कल्पना असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी त्याने मार्शल आर्ट कराटे ट्रेनिंग करून ब्लॅक बेल्ट प्राप्त केला. सायकल चालविणे, सुरुवातीला दोन नंतर सहा किमीपर्यंत दौड, मोटारसायकल चालविणे, कार, ट्रॅक्टर चालविणे अशी सर्वसामान्यांशी निगडित दिनचर्या त्याने सुरू ठेवली. अपंगत्व आल्यामुळे रोजगार नाही; मात्र एका वीटभट्टीवर बेरोजगारासारखा जाऊन तेथील मालकाशी मैत्री वाढवून या व्यवसायाचे ज्ञान प्राप्त केले. यानंतर अशोकनेही स्वत:ची वीटभट्टी सुरू केली. इथवरच तो थांबला नाही, तर शेतात राबून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. याच काळात त्याने इच्छेची पूर्तता करण्यासाठी मूर्ती या गावाजवळच्या आनंदगड (चिखलागड) या टेकडीवर चढणे सुरू केले. त्यात त्याला यशही आले.
गावाजवळच्या मोठ्या टेकडीवर चढल्यामुळे अशोकचा आत्मविश्वास वाढला. यामुळेच त्याने सातपुडा पर्वतातील सर्वात कठीण चढाई असलेला निशाणगड चढण्याचा मनोदय ठरविला. यानुसार त्याने आॅगस्ट २०१० आणि आॅगस्ट २०११ मध्ये तो पर्वत पार केला. जगावेगळे काहीतरी करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या या तरुणाने नंतर निशाणगडनजीकचा ४५ किमी परिसर पायी पिंजून काढला. तसेच कार नदी प्रकल्पाची ६५ अंश कोनातील भिंतीची चढाई केली. २९ आॅक्टोबर २०११ रोजी पातालकोट (मध्य प्रदेश) जंगलातील ७० किमी परिसर आणि पहाड फिरला. यानंतर त्याच वर्षी १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई (१६४६ मीटर) सर केले. अशोकला जिम्नॅस्टिक, स्विमिंग, माऊंटेनिंग, मार्शल आर्ट (कराटे), अ‍ॅडव्हेंचर, रॉक क्लायमिंग, योगा आदींमध्ये आवड आहे.
....
पुन्हा एकदा आडकाठी!
जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर चढण्याचा बेत अशोकने २०१२ मध्येच केला होता. ‘१२-१२-१२’ असा योग साधून त्याने ‘मिशन एव्हरेस्ट’ सर करण्याचे ठरविले होते. मात्र त्यावेळी त्याचे प्रशिक्षण पूर्ण झालेले नव्हते. कमी तापमानात राहण्यासाठीही तो परिपक्व नव्हता. त्यामुळे १२-१२-१२ चा योग जुळून आला नाही. त्यानंतर तीन वर्षांआधीही त्याने नियोजन केले होते. परंतु महाप्रलय आल्याने त्याला अपयश आले. मात्र निसर्गाच्या आडकाठीने अपयशी न होता त्याचा संघर्ष सुरूच होता. अखेर २०१६ मध्ये त्याने एव्हरेस्ट सर करण्याचे नियोजन केले. त्यानुसार त्याने शिखर पादाक्रांत करण्यास सुरूवातही केली. मात्र ८५०० मीटरपर्यंत गेल्यानंतर त्याच्या पायाला इजा झाली आणि केवळ ३४८ मीटर अंतर राहिले असताना तेथून परतीचा मार्ग धरावा लागला. त्यामुळे पुन्हा त्याच्या मार्गात आडकाठी आली.

एव्हरेस्टची ‘अशोक टीम’
अशोक मुन्ने या ध्येयवेड्या तरुणासोबत एव्हरेस्ट सर करण्याच्या टीममध्ये सुशील शर्मा, राधा राममूर्ती गोल्लापल्ली, एस. प्रभाकरण, शिवरामण बालन, बद्रैया धुबी, शेख बचीनेपल्ली, विमलकुमार जयस्वाल यांचा समावेश होता. यापैकी पाच गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले आहे, हे विशेष! एकूण आठ जणांच्या टीममध्ये एका महिलेचाही समावेश होता. या चमूने एकूण ८५०० मीटरपर्यंतचे अंतर पूर्ण केले. मात्र अशोकला झालेल्या दुखापतीमुळे आणि वाढत्या वेदनेमुळे पुढच्या प्रवासाला विराम देण्यात आला. आता पुढल्या वर्षी ‘मोहीम फत्ते’ करू, असा विश्वास अशोकने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

‘लोकमत’बद्दल कृतज्ञता
एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी किमान ३२ लाखांचा खर्च अपेक्षित होता. यासाठी त्याने अनेकांची दारे ठोठावली. बऱ्याच ठिकाणी त्याचा अपेक्षाभंग झाला. याचदरम्यान त्याचा हा संघर्ष ‘लोकमत’ने जगासमोर आणला आणि पाहता - पाहता त्याला आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. या मदतीनेच त्याला एव्हरेस्ट सर करण्यासाठी हातभार लागला. मात्र केवळ अवघे ३४८ मीटर अंतर सोडून त्याला परतीचा मार्ग धरावा लागला. ‘लोकमत’मुळे आपल्याला आर्थिक हातभार लागला, एव्हरेस्ट वाट सुकर झाली, याबद्दल अशोकने कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Divyang Ashoka's Everest Bharari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.