बहारदार नाट्यपदांचा ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’

By Admin | Updated: May 19, 2014 00:48 IST2014-05-19T00:48:19+5:302014-05-19T00:48:19+5:30

मराठी रंगभूमीच्या सुवर्णयुगातील अभिजात नाट्यपदांचा ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’ या कार्यक्रमाचे आयोजन संस्कार भारतीतर्फे सायंटिफिक सभागृहात करण्यात आले.

'Divya Swatantri Ravi' of the theatrical drama | बहारदार नाट्यपदांचा ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’

बहारदार नाट्यपदांचा ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’

 नागपूर : मराठी रंगभूमीच्या सुवर्णयुगातील अभिजात नाट्यपदांचा ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’ या कार्यक्रमाचे आयोजन संस्कार भारतीतर्फे सायंटिफिक सभागृहात करण्यात आले. प्रभाकर वखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही मैफिल आयोजित करण्यात आली. संगीत रंगभूमीच्या उदयापासून कायम लोकप्रिय ठरलेल्या मधुर व प्रासादिक रचनांचा हा श्रवणीय नजराणा रसिकांना आनंद देणारा होता. सन १८८० ला रंगभूमीवर किर्लोस्करांचा उदय झाला. यानंतर संगीत रंगभूमीवर क्रांती झाली. किर्लोस्कर, खाडिलकर, गडकरी, देवलवीर वामनराव जोशी असे मोठे नाटककार आणि बालगंधर्व, केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ असे ताकदीचे गायक, नट आणि नाटक कंपन्या यामुळे मराठी संगीत रंगभूमीला विलक्षण बहार आली. लोकांचे मनोरंजन व लोकशिक्षण यामुळे नाटकांनी लोकांना वेडे केले. कार्यक्रमात किर्लोस्कर ते पुरुषोत्तम दारव्हेकर, विद्याधर गोखले आदींच्या आतापर्यंतच्या अमीट अनुभूतीच्या आणि शास्त्रीय रागसंगीतावर आधारीत २० नाट्यगीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. श्याम देशपांडे, विनोद वखरे, अनिरुद्ध देशपांडे, नेहा दफ्तरी, वंदना देवधर या गायकांनी तयारीच्या सादरीकरणाने ही मैफिल तोलून धरली. सहभागी गायकांच्या सामूहिक स्वरातील शाकुंतल नाटकातील नांदीने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. सर्वच गायकांच्या आवाजाला शास्त्रीय सुरावटींचे रेशमी अस्तर असल्याने त्यांचे सादरीकरण भावपूर्ण झाले. नेहा दफ्तरी यांनी ‘झाले युवती मना...(मानापमान)’, ‘मधुकर वन वन फिरत आज...(विद्याहरण)’, ‘उगवला चंद्र पुनवेचा...(संन्यस्त खड्ग)’ आदी गीते सादर केली. वंदना देवधर यांनी ‘नरवर कृष्णा समान...(स्वयंवर), मर्म बंधातली ठेव ही...(संन्यस्तखड्ग)’ आणि विनोद वखरे यांनी ‘कर हा करी धरीला शुभांगी...(संशयकल्लोळ), जयोस्तुते हे उषादेवते...(मंदारमाला), हे सुरांनो चंद्र व्हा...(ययाती देवयानी), या भवनातील गीत पुराणे...(कट्यार काळजात घुसली)’ ही पदे सादर केली. श्याम देशपांडे यांनी जय गंगे भागीरथी, अनिरुद्ध देशपांडेने दिव्य स्वातंत्र्य रवी, काटा रुते कुणाला आदी गीतांनी ही मैफिल सजविली. दीपक फडणवीस, श्याम ओझा, सुमंत देवपुजारी यांनी सहवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदिका पिंपळापुरे यांनी तर अभ्यासपूर्ण निवेदन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार, नगरसेवक संदीप जोशी, गोपाळ बेहरे, प्रकाश वाघमारे, उषाताई वखरे, संस्कार भारतीचे कार्याध्यक्ष वीरेंद्र चांडक उपस्थित होते. या कार्यक्रमाला रसिकांचा भरगच्च प्रतिसाद लाभला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Divya Swatantri Ravi' of the theatrical drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.