चार तालुक्यांसाठी जिल्हा सत्र न्यायालय व्हावे
By Admin | Updated: November 24, 2014 01:16 IST2014-11-24T01:16:33+5:302014-11-24T01:16:33+5:30
नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या, न्यायालयातील गर्दी व खेड्यापाड्यातील पक्षकारांना पडणारा आर्थिक भुर्दंड ही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूरऐवजी कळमेश्वर, सावनेर, काटोल

चार तालुक्यांसाठी जिल्हा सत्र न्यायालय व्हावे
न्या. भूषण गवई : कळमेश्वर येथे नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ
कळमेश्वर : नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या, न्यायालयातील गर्दी व खेड्यापाड्यातील पक्षकारांना पडणारा आर्थिक भुर्दंड ही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूरऐवजी कळमेश्वर, सावनेर, काटोल व नरखेड या चार तालुक्यांसाठी जिल्हा सत्र न्यायालय स्थापन व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
कळमेश्वर येथील दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे पालक न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती किशोर सोनवणे, आ. सुनील केदार, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत ताजने, प्रबंधक राजेंद्रकर, कळमेश्वरचे न्यायाधीश विकास कारमोरे, जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, न्या. बेदरकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी नगर परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे कुमकुम तिलक करून स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या चमूने स्वागतगीत सादर केले.
अॅड. सागर कऊटकर यांनी प्रास्ताविकात कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड हे तालुके मिळून कळमेश्वर येथे विभागीय जिल्हा सत्र न्यायालय स्थापन करावे, अशी मागणी केली.
याप्रसंगी न्या. किशोर सोनवणे यांनी आपल्या भाषणात नवीन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ होत असल्याने नागरिकांची गैरसोय संपणार आहे. या नवीन इमारतीसाठी तीन कोटी २१ लाख रुपये निधीतून नियोजित इमारत सहा महिन्यात बांधकाम विभाग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. सुनील केदार, अॅड. ताजने यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास जिल्हा सत्र न्यायमूर्तीसह कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड, हिंगणा, उमरेड, रामटेक, कामठी न्यायालयाचे न्यायमूर्ती, उपविभागीय पोलीस अधिकारी मोरेश्वर आत्राम, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, तहसीलदार, मुख्याधिकारी, विविध विभागातील अधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, विधी कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. संचालन अॅड. युवराज बागडे यांनी तर उपस्थितांचे आभार न्या. विकास कारमोरे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. (प्रतिनिधी)