जिल्हा न्यायालयासाठी अतिरिक्त ५० कोटी
By Admin | Updated: April 9, 2016 03:13 IST2016-04-09T03:13:06+5:302016-04-09T03:13:06+5:30
नागपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी आणखी ५० कोटी रुपये देण्याची घोषणा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

जिल्हा न्यायालयासाठी अतिरिक्त ५० कोटी
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा : ‘जस्टिसिया’ स्नेहमिलन कार्यक्रमाचे उद््घाटन
नागपूर : नागपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी आणखी ५० कोटी रुपये देण्याची घोषणा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नागपूर जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने देशपांडे सभागृहात आयोजित ‘जस्टिसिया’ या तीन दिवसीय स्नेहमिलन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई होते.
बावनकुळे म्हणाले की, यापूर्वी या इमारतीसाठी ९१ कोटी रुपये मंजूर केले आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. ही इमारत जिल्हा बार असोसिएशनच्या पाच पदाधिकाऱ्याच्या देखरेखीत निर्माण होईल.
अतिरिक्त ५० कोटीं रुपये खर्च करण्यासाठी योजना तयार केली जात असल्याचेही पालकमंत्री म्हणाले. जिल्हा बार असोसिएशनच्या स्थापनेला १४० वर्षे पूर्ण झाली आहेत.
या असोसिएशनने देशाला खूप काही दिले आहे. कर्तृत्ववान लोक आपल्यातून तयार झाले आहेत. मुख्यमंत्री झालेले डीबीएचे सदस्य देवेंद्र फडणवीस आज १८ तास काम करतात, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीबीएचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल यांनी केले.
वसंत साठे यांनी दिल्ली येथील भेटी दरम्यान सांगितलेल्या माहितीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, १९४२ चे स्वातंत्र्य आंदोलन सुरू असताना तरुण वकील मंडळी जत्थ्याने व्हेरायटी चौकातून जिल्हा न्यायालयाच्या आवारात आली होती. त्यावेळी सत्र न्यायालयाचे कामकाज दगडी इमारतीमध्ये चालत होते.
या वकिलांनी चक्क दगडी इमारतीवर चढून तेथील ‘युनियन जॅक’ काढून तिरंगा फडकावला होता.
प्रारंभी ज्येष्ठ वकील अॅड. अविनाश गुप्ता, अॅड. एस. के. मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कार्यकारी महाधिवक्ता रोहित देव, कार्यक्रमाचे संयोजक अॅड. उदय डबले होते.
या कार्यक्रमाचे संचालन अॅड. राधिका जयस्वाल आणि अॅड. सचिन नारळे यांनी केले तर डीबीएचे सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रसंगी न्या. प्रसन्ना वराळे, न्या. एस. बी. शुक्रे, न्या. झेड. ए. हक, न्या. अतुल चांदूरकर,न्या. स्वप्ना जोशी, अॅड. राजाभाऊ देशपांडे, अॅड. राजेंद्र पाटील, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे आसिफ कुरेशी, अनिल गोवारदीपे उपस्थित होते. (प्रतिनिधी)