लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची पुणे महानगर आयुक्तपदी बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पदावर नवीन अधिकारी नियुक्त होईपर्यंत इटनकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार राहणार आहे. ते शुक्रवारी डॉ. चौधरी यांच्याकडून महापालिका पदभार स्वीकारणार आहेत.
आयुक्तपदाचा गेल्या चार वर्षापासून नागपूर महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू होता. आता महापालिकेचा कारभार पुन्हा पदाधिकाऱ्यांच्या हाती आला आहे. त्यामुळे नव्या आयुक्तांसमोर अनेक प्रशासकीय व आर्थिक आव्हाने उभी राहणार आहेत. विशेषतः महापालिकेचा आगामी अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी लवकरच इटनकर यांच्यावर येणार आहे. स्थायी समिती अध्यक्षांसमोर ते कोणत्या पद्धतीने बजेट सादर करतात, याकडे पदाधिकारी व नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. मागील चार वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात अनेक प्रभागांतील विकासकामांना अपेक्षित निधी मिळाला नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्यामुळे विकासकामांसाठी अधिक निधीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प तयार करताना इटनकर यांना आर्थिक समतोल साधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
महापालिकेचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर व नगररचना विभागाच्या वसुलीतही यंदा मागील वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परिस्थितीचा परिणाम आगामी अर्थसंकल्पावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नव्या आयुक्तांसमोर महापालिकेचा आर्थिक ताळमेळ राखण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.